Join us

महापालिकेचा लाचखोर मुकादम जाळ्यात, नोकरी लावण्यासाठी मागितले तीन लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:48 IST

दरम्यान, त्याला ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई : कचरा उचलण्याच्या गाडीवर सफाई कामगार म्हणून नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून मुंबई महापालिकेच्या अंधेरीतील के-वेस्ट वॉर्डमधील मुकादम सतीश पिंट्या जाधव (५५) याने तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील २० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्याला रंगेहाथ पकडले. दरम्यान, त्याला ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असून, त्यांना कायमस्वरूपी नोकरीची आवश्यकता आहे. त्यामुळे एका परिचयाच्या व्यक्तीने त्यांची ओळख जाधव याच्याशी करून दिली. गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी जाधवने त्यांना पालिकेत कचरा उचलण्याच्या गाडीवर सफाई कामगार म्हणून नोकरी देतो, सहा महिन्यांत तुम्ही कायम व्हाल, असे आश्वासन दिले. त्यासाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी ५० हजार, नंतर अडीच लाख अशा एकूण तीन लाखांची मागणी केली. अखेर, तक्रारदार यांनी ३० डिसेंबरला ‘एसीबी’कडे तक्रार केली.

२० हजार घेताना पकडले- जाधव याने तक्रारदार यांना अर्ज व कागदपत्रे घेऊन २ जानेवारी रोजी येण्यास सांगितले. - कामासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे कबूल केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.- त्यानुसार, ‘एसीबी’नेही सापळा रचला. २० हजारांचा हफ्ता स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडून अटक केली.   

टॅग्स :लाच प्रकरणभ्रष्टाचारलाचलुचपत प्रतिबंधक विभागमुंबई महानगरपालिका