पालिका उमेदवारीचा पेपर सोपा, पहिली लढाई जिंकली, भाजपच्या २६ तर शिंदेसेनेच्या १४ माजी नगरसेवकांचे वॉर्ड ‘जैसे थेे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:34 IST2025-11-12T13:33:56+5:302025-11-12T13:34:10+5:30
Mumbai Municipal Corporation Election News: महापालिकेच्या आरक्षण सोडतीत अनेक माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला तर काहींचे आरक्षण ‘जैसे थेे’ राहिल्याने दिलासा मिळाला आहे. ५९ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण यंदाही कायम राहिल्याने त्यांनी पहिली लढाई जिंकली आहे. आता त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालिका उमेदवारीचा पेपर सोपा, पहिली लढाई जिंकली, भाजपच्या २६ तर शिंदेसेनेच्या १४ माजी नगरसेवकांचे वॉर्ड ‘जैसे थेे’
- सीमा महांगडे
मुंबई : महापालिकेच्या आरक्षण सोडतीत अनेक माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला तर काहींचे आरक्षण ‘जैसे थेे’ राहिल्याने दिलासा मिळाला आहे. ५९ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण यंदाही कायम राहिल्याने त्यांनी पहिली लढाई जिंकली आहे. आता त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह माजी नगरसेवक अनिल कोकीळ, प्रभाकर शिंदे, बाळा तावडे यांना दिलासा मिळाला आहे. यात भाजपच्या सर्वाधिक २६ तर शिंदेसेनेकडील १४ माजी नगरसेवक आहेत. ज्यांची जागा तशीच कायम राहिली, ते आता तिकीट मिळवण्यासाठी तयारीला लागले आहेत. भाजपच्या २६ माजी नगरसेवकांमध्ये बिना दोशी, बाळा तावडे, विनोद मिश्रा, रोहन राठोड, हेतल गाला आदींचा समावेश आहे.
काँग्रेसच्या आशा कोपरकर, मेहेर हैदर, अश्रफ आझमी यांच्याही जागा कायम आहेत. उद्धवसेनेच्या ११ तर शिंदेसेनेच्या १४ माजी नगरसेवकांच्या जागा कायम राहिल्या आहेत. त्यांनाही आता उमेदवारीची आशा आहे.
प्रशासकराजमध्ये आयुक्त इतके हतबल झाले की पाणी, कचरा, सांडपाणी यांसारख्या मूलभूत सुविधांकडेही त्यांना लक्ष देता आलेले नाही. यापूर्वीही तीन वेळा मुंबईकरांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संधी दिली आहे. यापुढेही आम्ही त्यांचा आवाज बनू.
राखी जाधव, माजी नगरसेविका
दुबार मतदार, मतचोरीचा जे आरोप करीत होते, ते आज आरक्षण सोडतीला उपस्थित होते. आरक्षणात सोडतीत सर्वच पक्षांना फटका बसला, फायदा झाला. जे आरोप करीत होते, त्यांनी आरक्षण सोडत किती पारदर्शकपणे पार पडली हे पाहिले असेल. माझा वॉर्ड वाचला आहे. मला पक्षाने पुन्हा संधी दिल्यास निवडणुकीस तयार आहे.
प्रभाकर शिंदे, माजी सभागृहनेता, भाजप
सांगळे, वरळीकर, सरवणकर यांना दिलासा
उद्धवसेनेच्या जागांमध्ये चित्रा सांगळे, हेमांगी वरळीकर, तर शिंदेसेनेच्या समृद्धी काते, संजय तुर्डे, समाधान सरवणकर यांचाही निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, समाजवादी पार्टीच्या शायरा खान तर राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) राखी जाधव यांनाही आता उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
आम्ही या आधी लढून जिंकलो व पुढेही लढून जिंकणार आहोत. फक्त सत्ताधाऱ्यांना निधी आणि इतरांना काही नाही, असे चालणार नाही. मुंबईकर पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवतील.
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर