At the Municipal Bank of Mumbai Municipal Corporation Billions of financial scams | मुंबई महापालिकेच्या दि म्युनिसिपल बँकेत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा
मुंबई महापालिकेच्या दि म्युनिसिपल बँकेत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : पीएनबी, पीएमसी, शिखर बँकेपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेच्या दि म्युनिसिपल को.आॅप. बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. बँकेच्या मुलुंड शाखेत हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबईतील अन्य शाखांमध्येही अंतर्गत चौकशी सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये, यासाठी काही जणांकडून हे प्रकरण दडपण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई मनपाच्या अखत्यारीत येत असलेल्या दि म्युनिसिपल बँकेच्या शहरात २२ शाखा आहे. बँकेमध्ये ८४ हजार ९१२ खाती आहेत. २०१८-१९ मध्ये बँकेच्या ठेवीमध्ये २५५.०७ कोटीने वाढ होत ३ हजार ४८१.०९ कोटी ठेवी आहे. सर्वसामान्य चतुर्थ श्रेणीतील कामगार मोठ्या संख्येने यात जोडले गेले आहेत. बँकेच्या मुलुंड शाखेत गेल्या काही दिवसांपासून बँकेचा शिपाई कार्यालयीन वेळेनंतरही बराच वेळ संगणकात डोकावत असल्याचे बँकेच्या कॅशिअर महिलेच्या निदर्शनास आले.

संबंधित शिपाई हा शाखा व्यवस्थापकाच्या आयडीचा वापर करत, बँकेतील अनामत रकमेवर (एफडी) येणाऱ्या एकत्रित व्याजाची रक्कम परस्पर बनावट शून्य ठेवीचे खाते तयार करून त्यात एनईएफटीद्वारे वळते करत होता. गेल्या दीड वर्षांपासून हा शिपाई तेथे कार्यरत आहे. वरिष्ठ आणि काही संचालकांसोबत हातमिळवणी करून हा प्रकार सुरू असल्याचीही शक्यता आहे. आतापर्यंत त्याने ३ कोटी ४९ लाख इतक्या पैशांची अफरातफर केल्याची प्राथमिक माहिती बँकेच्या अंतर्गत चौकशीतून समोर आल्याचे समजते.

तपास सुरू आहे...

मुलुंडच्या शाखेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी तपास सुरू आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या गैरव्यवहार झालेल्या रकमेचे लेखापरीक्षण सुरू आहे. याबाबत पोलिसांकडेही पत्राद्वारे तक्रार दिली आहे. त्यानुसार, कारवाई करण्यात येईल. मुलुंडप्रमाणे मुंबईतील अन्य शाखांमध्येही तपासणी सुरू आहे. खातेदारांचे पैसे सुरक्षित आहे. मुलुंडमध्ये झालेली फसवणुकीची रक्कम ही कार्यालयीन खर्चातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
- विनोद रावदका, महाव्यवस्थापक, दि म्युनिसिपल को.आॅप. बँक लिमिटेड, मुंबई.

अद्याप तक्रार नाही...
या प्रकरणी कुठल्याही स्वरूपाची तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. अशी काही तक्रार येताच गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येईल.
- रवी सरदेसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड पोलीस ठाणे.

Web Title: At the Municipal Bank of Mumbai Municipal Corporation Billions of financial scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.