Mumbais newest train runs today on Western Railway with CCTVs better seats | सर्व डब्यांत सीसीटीव्ही, नवं डिझाईन अन् बरंच काही; मुंबईकरांची नवी लोकल लय भारी

सर्व डब्यांत सीसीटीव्ही, नवं डिझाईन अन् बरंच काही; मुंबईकरांची नवी लोकल लय भारी

मुंबई: मुंबईकरांच्या सेवेत नवी लोकल दाखल झाली आहे. आज पहिल्यांदा ही लोकल मुंबईकरांना घेऊन धावेल. सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणारी ही पहिली नॉन एसी लोकल असेल. सध्या धावत असणाऱ्या नॉन एसी लोकलच्या केवळ महिला डब्यांमध्येच सीसीटीव्ही आहेत. तर पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणारी नॉन एसी पहिल्यांदाच मुंबईत धावेल.

नव्या लोकलमध्ये अनेक उत्तम सोयीसुविधा असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली. 'सध्या प्रायोगिक तत्त्वावर नवी लोकल चालवण्यात येईल. यानंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन पुढील उत्पादनाबद्दलचा निर्णय घेण्यात येईल,' असं भाकर म्हणाले. आज पहिल्यांदा ही लोकल मुंबईत धावेल. विशेष म्हणजे या रेल्वेतून प्रथम प्रवास करण्याची संधी महिलांना मिळेल. संध्याकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी चर्चगेटहून सुटणारी लोकल 7 वाजून 57 मिनिटांनी विरारला पोहोचेल. ही लोकल लेडिज स्पेशल असेल. उद्यापासून नव्या लोकलच्या 10 फेऱ्या होतील.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच अँटी डेंट पार्टिशन्स, मॉड्युलर लगेज रॅक ही नव्या लोकलची वैशिष्ट्य आहेत. या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातली आसनं आधीच्या तुलनेत आरामदायी आहेत. तर सेकंड क्लासची आसनं फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिकपासून (एफपीआर) तयार करण्यात आली आहेत. नव्या लोकलमधील हँडलचं डिझाईनदेखील बदलण्यात आल्याचं रेल्वेनं सांगितलं आहे. एकावेळी दोन व्यक्ती धरू शकतील, अशा पद्धतीनं हँडलची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या धावणाऱ्या लोकलमध्ये इमर्जन्सीवेळी खेचण्यासाठी चेन आहेत. त्याऐवजी नव्या लोकलमध्ये बटण देण्यात आलं आहे. याशिवाय विजेची बचत करणारे पंखे आणि एलईडी लाईट्स ही नव्या लोकलची वैशिष्ट्यं आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbais newest train runs today on Western Railway with CCTVs better seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.