Join us

Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:52 IST

Mumbai Local Central Line Disrupted: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईची 'लाईफलाईन' समजली जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईची 'लाईफलाईन' समजली जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी, आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर रेल्वे रुळांवर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे रेल्वे सेवा जवळपास २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत.

आंदोलनस्थळी तणावाची स्थितीमिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्टेशनवर शेकडो आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना रुळांवरून हटवले. मात्र, अनेक आंदोलक अजूनही प्लॅटफॉर्मवर आणि रुळांच्या जवळ थांबून आहेत, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 'कॉशन ऑर्डर' लागू केली आहे. यामुळे रेल्वेचा वेग मंदावला आहे. रेल्वेचा खोळंबा अर्ध्या तासाहून अधिक आहे.

या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीएसएमटी स्टेशनवर ३०० हून अधिक आरपीएफ आणि जीआरपी जवान तैनात करण्यात आले आहेत. आंदोलक मानवी मनोरे रचत आहेत आणि हातामध्ये झेंडे घेऊन आंदोलन करत आहेत.

ओव्हर हेड वायरचा धोकाआंदोलकांनी ओव्हर हेड वायरजवळ जाऊ नये, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, ओव्हर हेड वायरमध्ये उच्च विद्युत प्रवाह असल्याने जीवितास धोका संभवतो.

मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना, या आंदोलनाचा फटका आता मुंबईच्या रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणमुंबई लोकलमध्य रेल्वेमुंबई ट्रेन अपडेटलोकल