मुंबई : दोन वर्षांच्या ब्रेकनंतर वातानुकूलित बसगाड्या पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. बेस्ट उपक्रम लवकरच चारशे वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्त्वावर घेणार आहे. विशेष म्हणजे किमान सहा ते २५ रुपयांमध्ये मुंबईकरांना गारेगार प्रवासाचा आनंद घेता येईल.
बेस्ट उपक्रमाने २००९ मध्ये वातानुकूलित बसेस खरेदी केल्या. खासगी वाहनांतून फिरणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करीत ही सेवा सुरू केली होती. तिकिटांचे दर जास्त असल्याने सुरुवातीपासूनच या सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. या बसेसच्या देखभालीचा खर्च वाढत गेला आणि सेवा तोट्यात गेली. त्यामुळे वातानुकूलित बसेस बेस्ट उपक्रमासाठी पांढरा हत्ती ठरूलागल्या. अखेर एप्रिल २०१७ मध्ये वातानुकूलित बस मार्ग बेस्ट प्रशासनाने रद्द केले.
मात्र पालिका प्रशासनाच्या अटीनुसार बसभाड्यात कपात करताना वातानुकूलित बसेसचे तिकीट दरही कमी केले आहेत. मंगळवारपासून लागू झालेल्या तिकिटांच्या नवीन दरानुसार वातानुकूलित बसेसचे किमान भाडे अवघे सहा रुपये केले आहे. दर कमी झाल्यावर प्रवासी वाढतील म्हणून बसेसची संख्याही वाढविण्यात येईल. ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्यात दोनशे वातानुकूलित बसेस ताफ्यात येतील. उर्वरित नोव्हेंबरपर्यंत येणार आहेत.