मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेलाही बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. या वाहतूक व्यवस्थेत एक बहुविध परिवहन केंद्र (मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट हब) उभारण्याची योजना आहे. त्यानुसार धारावीत मुंबईचे पहिले ‘मेट्रो इंटरचेंज स्टेशन’ उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे स्थानक सर्व मेट्रो मार्गांसह भविष्यातील योजनांना उपयुक्त ठरणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लानसह विविध योजनांची माहिती आता उघड होत आहे. त्यानुसार, धारावी पुनर्विकास योजनेत विविध पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक कल्याणकारी योजनांचा समावेश केला आहे. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवा चेहरा मिळू शकेल, असे बहुविध परिवहन केंद्र (मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट हब) उभारण्याची योजना आहे. प्रकल्पाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये मुंबईचे पहिले आणि एकमेव मेट्रो इंटरचेंज स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बहुस्तरीय स्थानकधारावी सेंट्रल मेट्रो स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मुख्य इंटरचेंज पॉइंट (वाहतूक बदल स्थानक) म्हणून याचा वापर होईल. हे स्थानक मल्टी-लेव्हल म्हणजे बहुस्तरीय असेल.
आदर्श वाहतूक मॉडेलस्थानिक परिसरांना मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी जोडणाऱ्या फीडर बस रूट्सचीही (स्थानिक जोड बस मार्ग) आखणी केली जात आहे. याचा फायदा प्रवाशांना होईल. मेट्रो, बस, रेल्वे सर्व एकत्र जोडून धारावीला वाहतूक मॉडेल बनवणे, हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ धारावी भाग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी आहे. येथे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्ग एकत्र येतात. त्यामुळे वाहतूक इंटरचेंजसाठी हे उत्तम ठिकाण आहे. हे स्थानक मेट्रो ३, पश्चिम आणि मध्य रेल्वे तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनजवळ आहे.मेट्रो लाईन ११ चा विस्तार धारावीत झाल्यास हा परिसर वाहतूक केंद्रित विकास (ट्रान्झिट-ओरिएंटेड) डेव्हलपमेंट म्हणून विकसित होईल. ज्यामुळे स्थानिकांसाठी मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक सुलभ होईल.बहुविध परिवहन केंद्रात मेट्रो लाईन ११ आणि महत्त्वाच्या शहर मार्गांच्या संगमावर स्थानक उभारण्यात येईल. यामध्ये रेल्वे, मेट्रो, फीडर बस, सायकलिंग आणि चालण्यासाठी जागा असेल. यामुळे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ चांगली होईल.