कोस्टल रोडच्या पुलाचा भार १७६ खांबांवर, देशात पहिल्यांदाच एकल स्तंभावर पूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 19:40 IST2021-04-29T19:39:44+5:302021-04-29T19:40:09+5:30
Coastal Road Mono Pile Technology : कोस्टल रोड अंतर्गत ३४ मीटर रुंदीचे व २१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत.

कोस्टल रोडच्या पुलाचा भार १७६ खांबांवर, देशात पहिल्यांदाच एकल स्तंभावर पूल
मुंबई - कोस्टल रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची डेडलाइन पाळण्यासाठी कोरोना काळातही हे काम जोमाने सुरू आहे. आता या प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाईल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे कोस्टल रोडचा भाग असणा-या पुलांखाली १७६ खांब उभारण्यात येणार आहेत. या पद्धतीने तीन चाचणी स्तंभांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलांचा भार एकखांबी वाहिला जाणार आहे.
कोस्टल रोड अंतर्गत ३४ मीटर रुंदीचे व २१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर १५.६६ कि.मी. लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) बांधण्यात येणार आहेत. समुद्र, नदी, तलाव आदीवरील पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणा-या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे चार स्तंभ उभारण्यात येतात. मात्र, एकल स्तंभ पद्धतीमध्ये खालपासून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो. त्यानुसार या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुलांखाली १७६ स्तंभ उभारण्यात येणार आहेत.
बांधकामाच्या वेळेत व खर्चात बचत......
परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करण्यासाठी प्रत्येक खांबाकरिता चार आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ अधिक लागला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत. त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार असल्याने समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार आहे. परिणामी, बांधकामाच्या वेळेत व खर्चात बचत होऊ शकेल.
देशात पहिलाच प्रयोग....
अशाप्रकारे पुलांची उभारणी करण्यात आलेल्या जगभरातील इतर पुलांचा सविस्तर अभ्यास महापालिका अभियंत्यांच्या चमुने व संबंधित सल्लागारांनी केल्यानंतर या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री युरोपातून आणण्यात आली असून कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणारे परदेशातील कुशल तंत्रज्ञ देखील या कामी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत.