मुंबईकरांना खूशखबर; लवकरच मिळणार २३८ एसी लोकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:55 IST2025-08-15T09:53:46+5:302025-08-15T09:55:04+5:30

एमयूटीपी-३ आणि ३ए अंतर्गत सुमारे १९ हजार २९३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव

Mumbaikars will soon get 238 AC local trains | मुंबईकरांना खूशखबर; लवकरच मिळणार २३८ एसी लोकल

मुंबईकरांना खूशखबर; लवकरच मिळणार २३८ एसी लोकल

महेश कोले 

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा संपन्न वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार आठवडाभरात तब्बल २३८ एसी लोकल खरेदीसाठी निविदा काढण्यात येणार असून, एमयूटीपी-३ आणि ३ए अंतर्गत सुमारे १९ हजार २९३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.

नवीन लोकलमध्ये प्रवासी क्षमतेत वाढ होणार असून, गादी असलेल्या आरामदायी सीट्स, अधिक शक्तिशाली एचव्हीएसी प्रणाली आणि मेट्रोप्रमाणे मोबाइल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या आधुनिक सुविधा असतील. निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदार निवडण्यासाठी ३ ते ६ महिने लागतील, त्यानंतर दोन वर्षात पहिली नमुना लोकल तयार होईल आणि पुढील मंजुरी प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गाडीचा वेग १३० किमी प्रतितास 

नवीन लोकलमध्ये गर्दीनुसार वातावरण संतुलीत करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक एचव्हीएसी प्रणाली असणार आहे. तसेच गाडीत गादीयुक्त आरामदायी आसने असतील, अशी शक्यता आहे. वाढीव विद्युत शक्तीमुळे लोकल १३० किमी प्रतितास वेगाने धावू शकतील. यामुळे स्थानकांवर दरवाजे उघडणे-बंद करण्यासाठी होणारा वेळेचा अपव्यय भरून निघेल. एमयूटीपी-३ अंतर्गत ४७, तर एमयूटीपी-३ ए अंतर्गत १९१ एसी लोकल खरेदी होणार आहेत. निविदेत १२ आणि १५ डब्यांच्या लोकलसाठी स्वतंत्र पर्याय असेल.

दोन नवीन ईएमयू कारशेड

 २३८ एसी लोकलसाठी दोन नवीन इएमयू कारशेड उभारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेसाठी भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेसाठी वाणगावमध्ये ती असणार आहेत. ही केंद्रे ज्या कंत्राटदाराला एसी लोकलचे कंत्राट मिळणार आहे, त्याच्या मार्फतच चालविण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले.
 

Web Title: Mumbaikars will soon get 238 AC local trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.