मुंबईकरांना मिळणार स्वस्त वीज; टाटा, अदानीनंतर आता महावितरणही देणार वीज, मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:22 IST2025-06-27T17:21:47+5:302025-06-27T17:22:50+5:30
मुंबईत वीज पुरवठा करण्याचा परवाना महावितरणने वीज नियामक आयोगाकडे मागितला आहे.

मुंबईकरांना मिळणार स्वस्त वीज; टाटा, अदानीनंतर आता महावितरणही देणार वीज, मागितली परवानगी
मुंबई शहर आणि उपनगरांत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर णि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या स्पर्धेत आता महावितरणही उतरले असून त्यांच्या तुलनेत मुंबईकरांना स्वस्त दराने वीज देण्याचा महावितरण प्रयत्न करणार आहे. मुंबईत वीज पुरवठा करण्याचा परवाना महावितरणने वीज नियामक आयोगाकडे मागितला आहे.
महावितरणचे मुंबईत वीज वितरणचे जाळे नसल्याने वीज पुरवठा करण्यासाठीच्या पायाभूत सेवा-सुविधा उभारणे हे प्रमुख आव्हान महावितरणपुढे असणार आहे. बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या तुलनेत मुंबईकरांना स्वस्त दराने वीज देऊ, असा दावा महावितरण अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केला. वीज नियामक आयोगाने वीजर निश्चितीच्या प्रस्तावावर बुधवारी निर्णय देत वीज दर कपातीचे आदेश दिले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी महावितरणच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत 'लोकमत'ने लोकेश चंद्र यांना मुंबईमधील वीज पुरवठ्याबाबत प्रश्न विचारले.
एकाच दराने मिळणार वीज
१. लोकेश चंद्र म्हणाले, राज्यात एका दराने वीज आणि मुंबईत दुसऱ्या दराने वीज, असे होणार नाही. त्यासाठी स्वतंत्र कंपनी नसेल. शिवाय येथील वीज कंपन्यांचे ग्राहक आपल्याकडे वळते करणे हा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे चंद्र यांनी सांगितले.
२. दरम्यान, मुंबईच्या पूर्व उपनगरात भांडूप व मुलुंड परिसरात महावितरण विजेचा पुरवठा करत असून आता महावितरण शहर आणि उर्वरित परिसरात आले तर चार वीज कंपन्यांत स्पर्धा होईल.
या क्षेत्रांसाठी हवी परवानगी
कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरांत वांद्रे ते दहिसर, पूर्व उपनगरांत विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा-भाईंदर क्षेत्रात परवाना मिळावा, अशी मागणी महावितरणने आयोगाकडे केली आहे.
बेस्ट, अदानी व टाटा पॉवर यांना समांतर परवाना देत मुंबईतही वीजपुरवठा करण्यास परवानगी मिळालवी, असे याचिकेत म्हटले आहे.
डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणात वीज लागते. अनेक सेंटर्स पूर्व आणि पश्चिम उपनगरांत विकसित होत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठ्याची गरज भासणार आहे.
राज्यभरातील वीज ग्राहकांना कमी दराने वीज देण्याचा प्रयत्न केला आहे. यात आणखी घट होण्यासाठी काम सुरू आहे. मुंबईत बेस्टचे भूमिगत वीज वितरणाचे जाळे आहे. महावितरणचे मुंबईत वीज वितरणाचे जाळे नाही. वीज पुरविण्यासाठीच्या पायाभूत सेवा सुविधा उभ्या करणे आव्हान आहे.
- लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण