दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टीतील दरवाढीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. दरवर्षी होणाऱ्या ८% पाणी दरवाढीला स्थगिती देऊन, पाण्याचे दर स्थिर ठेवण्याकरता प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर टँकर माफीयांचे वाढलेले प्रस्थ आणि त्यांची मक्तेदारी बंद करण्याकरता 'टँकर माफिया फ्री मुंबई', हे धोरण राबविण्यात येईल, अशी घोषणा मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी केली.
महायुतीचे 'विकसित मुंबई -सुरक्षित मुंबई' या वचनाशी आपण कटिबद्ध राहू ,असे आश्वासनही त्यांनी दिले. मुंबईच्या महापौर म्हणून तावडे आणि उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची आज पालिका सभागृहात निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त झालेले पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही निवड जाहीर केली. विरोधी पक्षांकडून कोणीही या पदांसाठी अर्ज भरला नसल्याने निवडणूक बिनविरोध झाली. ही निवड होत असताना विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महापौरांचे भाषण संपेपर्यंत घोषणाबाजी सुरू होती.पीठासीन अधिकारी म्हणून माजी महापौरांची निवड न करता हे अधिकार सरकारने परिपत्रक काढून आयुक्तांना दिल्यामुळे विरोधी पक्षांनी निषेध केला. शिंदे सेनेच्या काही सदस्यांनी कागद फाडले. उपमहापौर भाषणास उभे राहिले असताना विरोधकांनी सभात्याग केला. तत्पूर्वी गोंधळ करणाऱ्या सदस्यांना शांत बसण्याचे आवाहन पिठासीन आयुक्त म्हणून गगराणी करत होते.
माजी महापौर किशोरी पेडणेकर हातात माईक घेऊन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करत होत्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात आले होते. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी बाकांवरून '५० खोके एकदम ओके ',अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्यास सत्ताधाऱ्यांनी 'मोदी मोदी' नावाचा जयजयकार करीत प्रत्युत्तर दिले. जवळपास सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. काही सदस्य महापौरांच्या समोर येऊन घोषणाबाजी करत होते. विरोधी पक्षांच्या काही सदस्यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी निषेध व्यक्त केला काँग्रेसच्या काही सदस्यांनी जमिनीवरच बैठक मारली होती.
तत्पूर्वी महापौरांनी आपल्या भाषणात पाणीपुरवठा, अग्निशमन दल, सार्वजनिक शौचालय, पार्किंग, पाणीपुरवठा प्रकल्प, वैद्यकीय सुविधा, मुंबईत निर्माण होणारी पूरपरिस्थिती, महापालिका शाळांचा दर्जा, गावठाणांचा विकास, पर्यावरणीय आराखडा,खड्डे अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला. एरवी महापौर पदाची निवडणूक असली की मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी पालिका मुख्यालयाच्या खाली असते. ढोल ताशांचा गजर असतो, फटाक्यांची आतषबाजी होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या जल्लोषाला फाटा देण्यात आला होता.
Web Summary : Newly elected Mayor Ritu Tawde announced a freeze on annual water tax hikes. Focus on eliminating the tanker mafia. The mayoral election faced opposition protests, but Tawde addressed key issues like water supply and infrastructure.
Web Summary : नवनिर्वाचित महापौर रितु तावडे ने वार्षिक जल कर वृद्धि पर रोक लगाने की घोषणा की। टैंकर माफिया को खत्म करने पर ध्यान केंद्रित किया गया। महापौर चुनाव में विरोध प्रदर्शन हुए, लेकिन तावडे ने जल आपूर्ति और बुनियादी ढांचे जैसे प्रमुख मुद्दों को संबोधित किया।