Join us

मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 08:25 IST

उपनगरांतून तसेच ठाणे, नवी मुंबई अशा विविध भागांतून नागरिक आले होते. चर्चगेट व छत्रपती शिवाजी महाराज स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. 

मुंबई : कफ परेडपर्यंत सुरू झालेल्या मेट्रो प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी सुट्टीच्या दिवशी लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली. मंत्रालय, कफ परेड, उच्च न्यायालय परिसरातील सरकारी कार्यालये आणि कॉर्पोरेट कंपन्यांची ऑफिसे बंद असल्याने रोजच्या नोकरदार प्रवाशांची वर्दळ कमी होती, मात्र मेट्रोतून प्रवास करण्यासाठी सामान्य नागरिकांनी कुटुंबांसह उत्साहात प्रवास केला. त्यांत लहान मुलांची संख्या मोठी होती.  उपनगरांतून तसेच ठाणे, नवी मुंबई अशा विविध भागांतून नागरिक आले होते. चर्चगेट व छत्रपती शिवाजी महाराज स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. 

अनेकांनी मोबाईल फोनवर फोटो आणि व्हिडिओ काढून पहिल्या प्रवासाचा अनुभव टिपला. सोशल मीडियावर थेट प्रसारण करून मित्रपरिवाराला मेट्रोचे दर्शन घडवण्याची अनेकांची इच्छा होती, मात्र मेट्रोच्या भूमिगत स्थानकांमध्ये अद्याप मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. 

चर्चगेट स्थानकावर कबुतरांचाही प्रवासचर्चगेट स्थानकावर काही कबुतरांनीदेखील ‘विना तिकीट’ प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले. प्रवाशांनी ही दृश्ये टिपली. “रेल्वेसारखी गर्दी नाही, सुसज्ज आणि शांत प्रवास आहे,” अशा भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या. तसेच स्वच्छतेबाबतही समाधान व्यक्त केले. 

अखेर स्वप्नपूर्ती झाली...मंत्रालय परिसरात बैठकीसाठी आलेल्या एका समूहाने चर्चगेट स्थानकातून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत प्रवास केला. मुंबईत भूमिगत मेट्रोमधून प्रवास हे स्वप्न पूर्ण झाले, अशी चर्चा त्यांच्यात रंगली होती. वाहतूक कोंडीतून प्रवास करण्याऐवजी हा प्रवास आरामदायी असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.     

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Metro: Holiday Crowds, Family Outings, Enthusiastic Kids, Awe for Adults

Web Summary : Mumbai's new metro saw huge holiday crowds. Families enjoyed the ride, children were excited. Passengers praised the clean, comfortable travel, a dream come true for many escaping traffic.
टॅग्स :मेट्रोमुंबई