प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुंबईकरांना मानाचे पान, पाच पाहुण्यांना विशेष निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:07 IST2025-01-14T11:07:17+5:302025-01-14T11:07:34+5:30

मुंबईतील अंगणवाड्यांत लसीकरण ते पोषण आहारापर्यंत सर्व उपक्रमांत उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यामुळे आमच्या विभागाचे कौतुक होते.

Mumbaikars to be given a page of honour at Republic Day function, five guests specially invited | प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुंबईकरांना मानाचे पान, पाच पाहुण्यांना विशेष निमंत्रण

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुंबईकरांना मानाचे पान, पाच पाहुण्यांना विशेष निमंत्रण

मुंबई : यंदा २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईतील पाच विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परेडमध्ये देशभरातून १० हजार, तर महाराष्ट्रातून २३ विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पाच मुंबईकरांना हा मान मिळणे अभिमानाची गोष्ट आहे, असे अतुल जाधव या निमंत्रितांपैकी एक असलेल्या तरुणाने म्हटले आहे. 

मुंबई विभागातून अँटॉप हिल येथील अतुल जाधव, वसई पश्चिम येथील वैभव पाटील यांची पंतप्रधान यशस्वी योजनेच्या श्रेणीतून निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर विशेष गुणांसह नामांकित शैक्षणिक संस्थांमधील गुणवंतांची पंतप्रधान यशस्वी योजनेतून निवड केली जाते, तर पद्मश्री ब्रह्मदेव पंडित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभय ब्रह्मदेव पंडित या पिता-पुत्रांना महाराष्ट्र टेक्सटाईल (हस्तकला) श्रेणीअंतर्गत आमंत्रित केले आहे. तसेच बदलापूर पश्चिम येथील अंगणवाडी सहायक आयुक्त उज्ज्वला पाटील यांना डब्ल्यूसीडी या श्रेणीअंतर्गत आमंत्रित करण्यात आले .

मुंबईतील अंगणवाड्यांत लसीकरण ते पोषण आहारापर्यंत सर्व उपक्रमांत उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यामुळे आमच्या विभागाचे कौतुक होते. प्रजासत्ताक कार्यक्रमासाठी माझे नाव सुचविल्याबद्दल मला अभिमान आहे, असे एकात्मिक बाल विकास योजना सेवा सहायक आयुक्त पदावर कार्यरत उज्ज्वला पाटील यांनी नमूद केले.

कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळणे ही आमच्या सर्व कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा पूर्ण हस्तकला क्षेत्राचा सन्मान असून संचालन प्रत्यक्ष पाहण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आता पूर्ण होत आहे, अशी प्रतिक्रिया ब्रह्मदेव पंडित आणि अभय पंडित यांनी दिली.

आई-वडिलांसाठी अभिमानाचा क्षण
माझे गाव सोकासन असून ते सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात वसलेले आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून माझे आई-वडील गावी शेती करतात. तिरूचिरापतल्ली येथील आयआयएममध्ये एमबीएसाठी प्रवेश घेताना सामायिक परीक्षेत ९८टक्के गुण मिळाले होते. त्याआधारे महाविद्यालयाने माझे नाव पाठविले होते. पीएम यशस्वीसाठी २० जणांमधून माझी निवड झाली, पण त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण येईल असे वाटले नव्हते, असे अतुल जाधव यांनी सांगितले.

Web Title: Mumbaikars to be given a page of honour at Republic Day function, five guests specially invited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.