मुंबईकरांची आलिशान घरांना पसंती, ५ कोटींच्या घरांची सर्वाधिक खरेदी, मोडले सगळे रेकॉर्ड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:35 IST2025-07-08T16:33:51+5:302025-07-08T16:35:16+5:30
गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील मुंबईत मालमत्तांच्या खरेदीमध्ये तेजी दिसत असून चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबईत एकूण ७५ हजार ६७२ मालमत्तांची खरेदी झाली आहे.

(AI जनरेटेड इमेज)
गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील मुंबईत मालमत्तांच्या खरेदीमध्ये तेजी दिसत असून चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबईत एकूण ७५ हजार ६७२ मालमत्तांची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा ४ टक्के अधिक वाढ नोंदली गेली आहे. या मालमत्ता खरेदीमध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे, तर उर्वरित २० टक्क्यांमध्ये कार्यालयीन तसेच व्यावसायिक स्वरुपाच्या मालमत्तांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, एकूण घरांच्या विक्रीमध्ये तब्बल ९६ टक्के घरे ही ५० लाख ते पाच कोटी रुपये किमती दरम्यानची आहेत. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे.
या सर्वेक्षणानुसार, ज्या घरांची किंमत ५० लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा घरांची खरेदी संख्या १८ हजार ६०४ इतकी आहे. तर ५० लाख ते एक कोटी रुपयांदरम्यानच्या घरांच्या खरेदीची संख्या ही ११ हजार ७२९ इतकी आहे.
ज्या घरांची किंमत एक ते पाच कोटी रुपयांदरम्यान आहे, अशा घरांच्या खरेदीचा आकडा १५ हजार २७० इतका आहे. पाच कोटी ते दहा कोटी रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या एकूण १०७५ घरांची खरेदी झाली आहे.
१० ते २० कोटी रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या एकूण १९९ घरांची खरेदी झाली आहे. तर २० ते ५० कोटी रुपये किंमत असलेल्या १२४ घरांची खरेदी झाली आहे. ५० कोटी आणि त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या ३४ घरांची खरेदी झाली आहे.
६,६९९ कोटींचा महसूल
१. विशेष म्हणजे, ज्या लोकांनी एक ते पाच कोटी रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या घराची खरेदी केली आहे. त्यांनी पहिल्यांदाच स्वत:चे घर साकारले आहे.
२. दरम्यान, या सहा महिन्यांत मालमत्ता विक्रीद्वारे सरकारला ६ हजार ६९९ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्कापोटी मिळाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरकारला ५८७४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.