मुंबई : चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहर व उपनगरात ज्या घरांची विक्री झाली त्या विक्रीमध्ये ज्या घरांची किंमत २ कोटी रुपयांपर्यंत आहे अशा घरांचा वाटा हा ८० टक्के असल्याची माहिती बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या नाईट फ्रैंक कंपनीच्या अभ्यासाद्वारे पुढे आली आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत मुंबईत एक लाख २८ हजार घरांची विक्री झाली आहे.त्यापैकी १ लाख १ हजार घरांची किंमत ही दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, मुंबईत आजच्या घडीला विभागानिहाय प्रति चौरस फूट दर २० हजार रुपयांपासून दीड लाख रुपये प्रति चौरस फूट दर असे आहेत.
दोन कोटी ते पाच कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण हे १५ टक्के असल्याचे दिसून आले आहे तर, ५ कोटी रुपये आणि त्यावरील घरांच्या विक्रीचे प्रमाण हे पाच टक्के इतके नोंदले गेले आहे. २०२३ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात मुंबईत एकूण १ लाख १४ हजार घरांची विक्री झाली होती. त्यापैकी ९४ हजार घरे अर्थात ८२ टक्के घरे ही दोन कोटी रुपयांपर्यंतच्या किमतीची होती.
२०२३ च्या तुलनेत पहिल्या ११ महिन्यात मुंबईत यावर्षी झालेल्या घरांची विक्री १२ टक्के अधिक नोंदली गेली आहे. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या घराचे आकारमान मुंबईतील विभागानुसार दोन बीएचके ते तीन बीएचके आहे. चार लोकांच्या कुटुंबासाठी ही घरे समाधानकारक असल्यामुळे ही घरे घेण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे विश्लेषण केले जात आहे. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या घरांच्या विक्रीचे सर्वाधिक प्रमाण हे मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात असल्याचेही दिसून आले आहे.