मुंबईकरांचा प्रवास आजही ‘नो’ बेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:53 AM2019-01-15T05:53:49+5:302019-01-15T05:54:04+5:30
संपावर तोडगा नाहीच : आठव्या दिवशीही हाल कायम
मुंबई : सात दिवसांपासून सुरू असलेला बेस्टचासंप सोमवारी मिटण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र, सोमवारी सकाळी बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव आणि राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी, मंगळवारीही बेस्टचा संप सुरूच राहणार असून, संपामुळे सात दिवसांपासून सुरू असलेले प्रवाशांचे हाल आठव्या दिवशीही कायमच राहणार आहेत.
सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण अशा अनेक मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी गेल्या सोमवारपासून संप पुकारला आहे. या मागण्यांबाबत सोमवारी बेस्ट कृती समिती आणि उच्च स्तरीय समिती यांच्यात सोमवारी सकाळी मंत्रालयात बैठक झाली. महत्त्वाचे म्हणजे, या बैठकीतही शनिवारप्रमाणेच बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक बैठक झाली, असे कामगार नेते शशांक राव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. उच्च स्तरीय समितीने बैठकीत आपले सर्व म्हणणे सविस्तरपणे मांडले व आमचे म्हणणेही शांतपणे ऐकून घेतले. आता ते त्यांचा अहवाल न्यायालयाकडे सादर करतील, अशीही माहिती बेस्ट कृती समितीकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली.
विलीनीकरणाचे आश्वासन
बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य करण्याबाबत राज्य सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नसली, तरी बेस्टच्या विलीनीकरणाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे आश्वासन उच्च स्तरीय समितीने बेस्टच्या कृती समितीला दिले आहे.
संप मिटणार कधी?
बेस्टच्या ३२ हजार कामगारांनी पुकारलेल्या संपानंतर महापालिका, बेस्ट प्रशासन, राज्य सरकार आणि कामगार संघटनांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले. मात्र, दुसऱ्या आठवड्यातील सोमवार उजाडला, तरी संपावर तोडगा निघालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे, बेस्टच्या संपाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला असतानाच, कामगार नेते शशांक राव यांनी राजकीय व्यासपीठावरील चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात बैठकांचे सत्र सुरूच असून, हाल होत असल्याने बेस्टचा संप कधी मिटणार? याकडे मुंबईकरांचेही लक्ष लागले आहे.
रांगा आणि प्रतीक्षा
सोमवारीही बेस्टचा संप सुरूच राहिल्याने मुंबईकरांचे हाल कायम राहिले. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांबाहेर रिक्षा आणि टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाशांना लांबलचक रांगा लावाव्या लागल्या. घाटकोपर, कुर्ला, भांडुप, मुलुंडसह दादर आणि भायखळा रेल्वे स्थानकांबाहेर रिक्षा आणि टॅक्सीसाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, वांद्रे यासह प्रमुख रेल्वे स्थानकांवर हीच स्थिती होती.
पर्यायी वाहतुकीवर ताण
मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर बस धावत नसल्याने काही प्रमाणात का होईना कोंडी कमी असेल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. उलटपक्षी रिक्षा, टॅक्सी, ओला-उबरसह खासगी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याने कोंडीत अधिकच भर पडली. परिणामी, ऐन गर्दीच्या काळात सकाळी आणि सायंकाळी वाहतूककोंडीत भर पडल्याचे चित्र होते.
कोंडी फुटेना : मुंबई ते ठाणे शहराला जोडणाºया लाल बहादूर शास्त्री मार्गावर माहिम निसर्ग उद्यान, कुर्ला डेपो, कमानी जंक्शन, घाटकोपर येथे नेहमीप्रमाणे संपकाळातही वाहतुकीची कोंडी कायम होती. कुर्ला अंधेरी मार्गावर साकीनाका जंक्शन, मरोळ, विद्याविहार रोडवरील हॉलीक्रॉस शाळेजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सायन सर्कल, माटुंगा येथील गांधी मार्केटजवळ कोंडी होती. मशीद बंदर येथील कोंडीही सातत्याने कायम असतानाच, फोर्ट येथील सीएसटीएम परिसरात कोंडीची समस्या कायम होती.