मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केला साडेनऊ लाख टन भाजीपाला; ११८३ कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 07:36 IST2023-05-02T07:36:37+5:302023-05-02T07:36:59+5:30
प्रतिदिन ३ हजार टन आवक

मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केला साडेनऊ लाख टन भाजीपाला; ११८३ कोटींची उलाढाल
नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईकरांनी मागील वर्षभरात तब्बल ९ लाख ६६ हजार ५११ टन भाजीपाला फस्त केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह गुजरात, कर्नाटकसह देशाच्या विविध भागांतून भाजीपाला विक्रीसाठी
मुंबई बाजार समितीमध्ये येत असतो. या व्यापारातून एक वर्षात ११८३ कोटी ११ लाख रुपयांची उलाढाल झाली. २०२०-२१ च्या तुलनेमध्ये बाजार समितीमध्ये तब्बल ३ लाख ४२ हजार टन जास्त आवकची नोंद झाली आहे. मुंबई व नवी मुंबईमधील जवळपास सव्वा कोटींपेक्षा जास्त नागरिकांना या मार्केटमधून अन्न, धान्य, भाजीपाला पुरविण्यात येत असतो. इतर शहरांच्या तुलनेमध्ये येथे बाजारभावही जास्त मिळत असल्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमधून भाजीपाला येथे विक्रीसाठी येत असतो.
२०२०-२१ मध्ये वर्षभरात १६ हजार ७०४ ट्रक व १ लाख ६ हजार टेम्पोंमधून ६ लाख २४ हजार २११ टन भाजीपाला विक्रीसाठी आला होता. वर्षभरात मार्केटमध्ये ७०९ कोटी ८४ लाख ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२२-२३ मध्ये आवक जवळपास ६० टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात ९ लाख ६६ हजार ५११ टन आवक झाली असून, वर्षभरात तब्बल ११८३ काेटी ११ लाख ६१ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समिती सचिव राजेश भुसारी, भाजी मार्केटचे सचिव मारुती पबीतवाद, संचालक शंकर पिंगळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, व्यापारी संघटना यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्केटमधील आवक व उलाढाल वाढू लागली आहे.
वर्षभरातील भाजीपाला मार्केटमधील आवक
महिना आवक (टन)
एप्रिल ७२४०९
मे ६६४४९
जून ६९४५८
जुलै ८१२४२
ऑगस्ट ९००६१
सप्टेंबर ७९९४४
ऑक्टोबर ७४९००
नोव्हेंबर ८५३५०
डिसेंबर ९८४२५
जानेवारी ९२१५१
फेब्रुवारी ७५९८९४
मार्च ८०१३०
एकूण ९६६५११