Join us

मुंबईकरांवर टांगती तलवार कायम; निवडणुकीमुळे थांबले धोकादायक पुलांचे ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 03:17 IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुलाच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतरही महापालिका म्हणावी तशी या प्रकरणी गंभीर नसल्याचे चित्र आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुलाच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतरही महापालिका म्हणावी तशी या प्रकरणी गंभीर नसल्याचे चित्र आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पुलांबाबत ठोस कार्यवाही अपेक्षित असतानाही प्रशासन ढिम्म असून, मुंबईकरांवर धोकादायक पुलांची टांगती तलवार कायम आहे. कारण पूल विभागात मुख्य जबाबदारी पार पाडत असलेल्या तांत्रिक अभियंत्यांनाच निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्याने पुलांबाबतची सर्व कामे तीन महिने खोळंबणार आहेत.लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूल विभागात मुख्य जबाबदारी पार पाडत असलेल्या तांत्रिक अभियंत्यांवर निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिणामी, मुंबई शहर आणि उपनगरातील पुलांच्या आॅडिटचे काम, पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम तीन महिनेखोळंबणार आहे. परिणामी, हे तीन महिने मुंबईकरांवर धोकादायक पुलांची टांगती तलवार कायमआहे.मुळात सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेनंतर पुलाच्या देखभाल दुरुस्तीची कामे वेगाने होतील, अशी आशा मुंबईकरांना होती. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या कामाने यास दिरंगाई होत आहे. पूल विभागातील ५५ अभियंत्यांपैकी ५४ अभियंत्यांना निवडणूकविषयक कामे देण्यात आली आहेत. परिणामी, अभियंत्यांवर निवडणूक कामाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने पुलांच्या देखभाल दुरुस्तीचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनासीएसएमटी पादचारी पूल