मुंबई - राज्य सरकारने राज्यात रेडीरेकनरचे नवे दर जाहीर केल्याने आता मुंबई महापालिका क्षेत्रासह सर्वत्र जागांचे दर वाढले आहेत. त्यामुळे घरांच्या प्रतिचौरस फुटाचे भावही वाढणार असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न आता डोळ्यात मावणे कठीण होणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.३९ टक्के वाढ करण्यात आली असून, नव्या दरांनुसार मलबार येथील प्रतिचौरस फुटाचा दर सर्वाधिक म्हणजे ६५ हजार ९०० रुपये, कुलाबा -४३ हजार रुपये, वांद्रे ४१ हजार रुपये, पवई २९ हजार रुपये इतका झाला आहे. गिरगाव, फोर्ट येथील दर ३२ हजारांवर पोहोचला आहे.
सदनिकांचे दर महापालिका क्षेत्राकरिता जमीन दर अधिक बांधकाम दर यांपेक्षा कमी असल्यास ते किमान जमीन दर अधिक बांधकाम दर याप्रमाणे ठेवण्यात आले आहेत. प्रभाव क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रात सदनिकांचे दर किमान बांधकामाएवढे येत नसल्यास, ते किमान बांधकाम दराइतके ठेवण्यात आले आहेत. चुकीचे मूल्यांकन असलेले झोन बदलण्यात आले असून, त्यांचे मूल्यांकन आता बाजारभावाशी करण्यात आले आहे. सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक याप्रमाणे बदलाची नोंद घेण्यात आली आहे.
तिजोरीवरील भार हलका करण्याचा प्रयत्न?कोरोना महामारीनंतर राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत रेडी रेकनरच्या दराची फेररचना केली नव्हती. सध्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत भार असल्याने मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून अधिक महसुलाची अपेक्षा सरकारला आहे. आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. या दरवाढीमुळे घरांच्या खरेदीदरात १६ ते १८ हजार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.