मुंबईकरांनो, उकाडा नको, एसीही हवा अन् लाइट बिलही कमी हवे; मग हे करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:57 IST2025-10-12T11:57:36+5:302025-10-12T11:57:55+5:30
त्यातून दिलासा मिळण्यासाठी एसीसोबतच पंखे आणखी वेगाने फिरत आहेत. पण, लाईट बिलाचा आकडाही धडकी भरवतो. अशावेळी गारवाही मिळेल आणि लाईट बिलही कमी येईल, यासाठी तज्ज्ञांनी उपाययोजना सुचविल्या आहेत...

मुंबईकरांनो, उकाडा नको, एसीही हवा अन् लाइट बिलही कमी हवे; मग हे करा!
मुंबई : पावसाळा संपून आता ऑक्टोबर हिटचे चटके बसू लागलेत. मान्सूनने शुक्रवारी मुंबईतून माघार घेताच दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबईवरील वातावरण अंधुक नोंदविण्यात आले. दुसरीकडे मान्सूनच्या परतीमुळे आकाश मोकळे झाले असून, मुंबईकरांवर सूर्यकिरणांचा थेट मारा होत आहे. परिणामी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईकर घामाघूम झाले असून तापदायक वातावरणामुळे उन्हाचा तडाखाही बसत आहे. त्यातून दिलासा मिळण्यासाठी एसीसोबतच पंखे आणखी वेगाने फिरत आहेत. पण, लाईट बिलाचा आकडाही धडकी भरवतो. अशावेळी गारवाही मिळेल आणि लाईट बिलही कमी येईल, यासाठी तज्ज्ञांनी उपाययोजना सुचविल्या आहेत.
उष्णतेच्या काळात, वीज वापर वाढतो, ज्यामुळे वीज देयकांवर लक्षणीय परिणाम होतो. या स्थितीत सर्व ग्राहकांना विजेचा मर्यादित वापर आणि खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी ऊर्जा बचत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. लहान, सातत्यपूर्ण बदलांमुळे दीर्घकालीन बचत होऊ शकते. परिणामी एसी मध्यम तापमानावर म्हणजेच सुमारे २४ अंशावर सेट करा. थंडपणा वाढविण्यासाठी सीलिंग फॅन वापरा. जागेनुसार वीज वापराचे नियमन करण्यासाठी ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे वापरा, असे उपाय बेस्ट, महावितरण, अदानी आणि टाटा या वीज कंपन्यांनी सुचविले आहेत.
वीज कंपन्यांचे आवाहन
वीज वापराच्या श्रेणीत दरांमध्ये बदल झाल्याने एसी, फ्रीजचा वाढता वापर वीज बिलात वाढ करू शकतो. अशा स्थितीत ऑक्टोबर हिटदरम्यान योग्य वीज वापराची जाणीव ठेवून स्वत:ला थंड वातावरणात राहण्याचे आवाहन वीज कंपनी प्रशासनाकडून ग्राहकांना करण्यात आले आहे.
अशी करा ऊर्जेची बचत
विजेचा वापर कमी करण्यासाठी उच्च वीज तारांकित असलेल्या उपकरणांचा वापर करा.
एकूण ऊर्जा खर्च कमी करण्यासाठी कमी वीज गरजेच्या काळात वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर वापरा.
वापरात नसताना चार्जर आणि उपकरणे अनप्लग करा.
एकाच वेळी अनेक उपकरणे डिस्कनेक्ट करण्यासाठी सामायिक स्विचसह पॉवर स्ट्रिप्स वापरा.
एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि इतर उपकरणे यांची नियमित देखभाल करा.