Join us
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने, चिमण्यांच्या धुराने गुदमरला मुंबईकरांचा श्वास; येत्या महिनाभरात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:36 IST

खैरानी रोडच्या भट्ट्यांची आता खैर नाही..! पालिकेकडून मार्गदर्शक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात अनधिकृतपणे चालणारे छोटे कारखाने, बेकरी- विविध वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांच्या भट्ट्यांच्या चिमण्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे परिसरातील वस्त्यांचा श्वास कोंडत आहे. श्वसनाचे विकार जडत आहेत. तीन आठवड्यांपूर्वीच येथील १३ अनधिकृत भट्ट्यांवर पालिकेने कारवाई करूनही काही भट्ट्या पुन्हा उभ्या राहिल्याने पालिकेच्या एल विभागाने दिवाळीनंतर कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवले  आहे.लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अवैध बांधकामांचे पेव फुटले होते.  पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून अवैध बांधकामांच्या सर्वाधिक तक्रारी आल्या होत्या. कुर्ला परिसरात साकीनाका येथील खैरानी रोड भागात सर्वात जास्त अवैध बांधकामे आहेत.

फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची येथील संख्या मोठी आहे. या भागात गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक आगी लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या अधिनियम ३९० अंतर्गत यापूर्वीच पालिका प्रशासनाकडून जवळपास ६६ छोट्या-मोठ्या कारखान्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र प्रदूषण वाढत असल्याने आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

खैरानी रोडच्या भट्ट्यांची आता खैर नाही..!

काही महिन्यांपूर्वी ६६ पैकी ३५ कारखाने पालिकेने जमीनदोस्त केले होते. त्यातील १२ कारखाने कायमचे बंद झाले. ५ ऑक्टोबरला आणखी १३ भट्ट्या पालिकेने जमीनदोस्त केल्या. त्यांचा वीज पुरवठा बंद करण्याचे निर्देश त्या त्या वीज कंपन्यांना देण्यात आले. त्यानंतरही काही कारखाने पुन्हा सुरू झाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

येत्या महिनाभरात कारवाई

 चांदिवली विशेषतः खैरानी रोड परिसरात या अनधिकृत बांधकामांची नियमित तपासणी होत असते. दिवाळीनंतर लगेचच या अनधिकृत भट्ट्या आणि गाळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहोत.  दरम्यान, ही कारवाई करताना काही गडबड-गोंधळ झाल्यास त्यासाठी आम्हाला पोलिसांचीही मदत लागेल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. 

पालिकेकडून मार्गदर्शक सूचना

हवेचा स्तर खालावल्याने पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी वॉर्ड स्तरावर करण्यास सुरुवात केली आहे. वॉर्ड स्तरावर नेमण्यात आलेल्या विशेष पथकांकडून पाहणी सुरू असून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्यास काम थांबविणे किंवा ते सील करण्यात येणार आहे.

हॉटेलच्या शेगड्याही तपासा

  खैरानी रोडवरील या अनधिकृत भट्ट्यांमधून सातत्याने धुरामुळे होणाऱ्या आजाराच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे आता या अनधिकृत गाळ्यांचे, भट्ट्यांचे पेव थांबवण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.   शिवाय मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा, बेकरी, उपाहारगृहे, रस्त्यांवरील स्टॉलवर शेगड्यांत कोणते इंधन वापरले जाते याची तपासणी करावी आणि त्यांच्यावरही कारवाई करावी अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. 

टॅग्स :वायू प्रदूषणमुंबईहॉटेल