मुंबईकरांना 'वॉक वे'ची भुरळ; तिजोरीत ७२ लाख जमा
By सीमा महांगडे | Updated: October 28, 2025 13:07 IST2025-10-28T13:06:52+5:302025-10-28T13:07:06+5:30
दिवाळीतील सुटीत चांगला प्रतिसाद, दोन लाख ९८ हजार पर्यटकांची भेट

मुंबईकरांना 'वॉक वे'ची भुरळ; तिजोरीत ७२ लाख जमा
सीमा महांगडे
मुंबई:मुंबई महापालिकेने सात महिन्यांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलेला मलबार हिल परिसरातील 'निसर्ग उन्नत मार्ग' मुंबईकरांच्या पसंतीस उतरत आहे. राणीच्या बागेनंतर हा मार्ग पर्यटकांचे आवडते स्थळ ठरत असून, दिवाळीतील सुटीत त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यतच्या दोन लाख ९८ हजार पर्यटकांनी या मार्गाला भेट दिली आहे.
कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशहा मेहता उद्यान येथे मे महिन्याच्या सुटीत आणि जुलैमध्ये वृक्षराजीमधून सर्वाधिक पर्यटकांनी मनसोक्त रपेट मारली आहे. पालिकेला यातून ७२ लाखांहून अधिकचा महसूलही प्राप्त झाला आहे. सिंगापूर येथील 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच उभारला आहे. महापालिकेच्या 'डी' विभागांतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान येथे जल अभियंता विभागाने हा प्रकल्प विकसित केला आहे.
दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला असतो. या उन्नत मार्गासाठी भारतीयांना २५ रुपये, तर परदेशी पर्यटकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. मुंबईतील नागरिकांसह येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांचाही या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
४८५ मीटर लांबीचा वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग उन्नत मार्ग
एकूण लांबी ४८५ मीटर, तर रुंदी २.४ मीटर.
समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी सी व्ह्यूइंग डेका, लाकडी फलाट, लाकडी कठडा, दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी सांधे अशा पद्धतीची रचना.
भक्कम पायाभरणीसह पोलादी जोडणीचा आधार.
पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली विकसित.
प्रकल्प कक्षातून संपूर्ण मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
जैव विविधता पाहण्याची संधी
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन या पुलावरून घडत आहे. १०० हून अधिक वनस्पतींसह झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी पाहायला मिळत आहेत. एका ठिकाणावरून गिरगाव चौपटीचेही विहंगम दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. दरम्यान, पर्यटकांना येथे पूर्वपरवानगीशिवाय चित्रीकरण करण्यास मनाई आहे, असे पालिकेने सांगितले.