अ‍ॅप बेस टॅक्सीचालकांच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:59 AM2018-10-23T05:59:16+5:302018-10-23T05:59:22+5:30

ओला-उबरसारखे अ‍ॅप बेस टॅक्सी व्यवस्थापन मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नाही तोपर्यंत शहरात एकही अ‍ॅब बेस टॅक्सी धावणार नसल्याचे सांगत सोमवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय अ‍ॅप बेस टॅक्सीचालक-मालकांनी घेतला आहे.

Mumbaikar trouble due to the movement of app base taxi drivers! | अ‍ॅप बेस टॅक्सीचालकांच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस!

अ‍ॅप बेस टॅक्सीचालकांच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस!

googlenewsNext

मुंबई : ओला-उबरसारखे अ‍ॅप बेस टॅक्सी व्यवस्थापन मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नाही तोपर्यंत शहरात एकही अ‍ॅब बेस टॅक्सी धावणार नसल्याचे सांगत सोमवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय अ‍ॅप बेस टॅक्सीचालक-मालकांनी घेतला आहे. परिणामी शहराच्या वाहतूककोंडीतून वाट काढत कार्यालयात पोहोचणारा मुंबईकर पुन्हा एकदा कंपनी आणि संघटना यांच्या वादात वेठीस धरला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुर्ला पश्चिम येथील उबर कार्यालयावर मागण्या मान्य करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र उबर व्यवस्थापनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. परिणामी सोमवारपासून बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघाचे सरचिटणीस गोंविदराव मोहिते यांनी दिली. तीन तास सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो अ‍ॅप बेस टॅक्सीचालक-मालकांनी सहभाग नोंदवत घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. अ‍ॅपवर टॅक्सी उपलब्ध नसल्याने रेल्वे किंवा बेस्टच्या मदतीने इच्छित स्थळ गाठताना मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागली. दक्षिण मुंबईत विशेषत: अ‍ॅप बेस टॅक्सींची वानवा असल्यामुळे काळी-पिवळी टॅक्सीला काही प्रवाशांनी पसंती दिली.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. पण अ‍ॅप बेस टॅक्सी कंपन्यांनी प्रती किलोमीटर मागे कोणतीही दरवाढ न करता किलोमीटरमागच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला चालक आणि मालकांनी विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
>या मागण्यांसाठी बेमुदत संप
ं‘आॅनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे, दुरुस्तीसाठी गेलेल्या गाडीच्या मालकांकडून दैनंदिन भाडे आणि व्याज घेऊ नये, या मागण्यांसाठी संप पुकारल्याचे ओला-उबर विभागाचे प्रमुख आणि संघटनेचे सचिव सुनील बोरकर यांनी सांगितले.
उबर व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, काही लोकांच्या जमावामुळे आमचे प्रवासी आणि चालक भागीदारांची गैरसोय झाली आहे. मुंबईतील प्रवासासाठी प्रवाशांना सोयीस्कर आणि विश्वासार्ह पर्याय देताना आमच्या चालक भागीदारांना स्थिर उत्पन्न मिळेल, याचीही आम्ही खातरजमा करतो, असे उबर प्रवक्ता यांनी स्पष्ट केले. तर ओला कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.
ओला-उबर कंपनी आणि संबंधित चालक-मालकांनी अशा प्रश्नांवर एकत्रित येऊन निर्णय घेणे योग्य आहे. प्रत्येक वेळी नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. वाढत्या इंधन दरांमुळे अ‍ॅप बेस टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांपेक्षा प्रत्यक्ष चालक-मालकांना फटका बसतो.
- सुदर्शन जाधव,
अ‍ॅप बेस टॅक्सी प्रवासी

Web Title: Mumbaikar trouble due to the movement of app base taxi drivers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.