Join us

बॅरेज धरणात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू

By पंकज पाटील | Updated: June 9, 2024 18:34 IST

बदलापूरच्या बॅरेज धरण परिसरात अनेक तरुण पिकनिकसाठी येत असतात.

बदलापूर: बुडणाऱ्या दोन मुलांना वाचणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचा बॅरेज धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापुरात समोर आली आहे. अनुज गोसावी असे या तरुणाचे नाव असून तो परळ, मुंबई येथे राहणारा आहे.      

बदलापूरच्या बॅरेज धरण परिसरात अनेक तरुण पिकनिकसाठी येत असतात. त्यावेळी अनेक तरुण येथील पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असतात. रविवारी (ता. ९) मुंबईच्या परळ येथील अनुज गोसावी हा १७ वर्षीय तरुणही मित्रांसह इथे आला होता. दुपारी १ वा. च्या सुमारास तिथे आलेल्या तरुणांच्या ग्रुप पैकी एका गृपमधील दोन जण पाण्यात पोहत असताना बुडू लागले. त्यांना वाचण्यासाठी अनुजने पाण्यात उडी घेतली आणि त्या दोघांना पाण्याबाहेर काढले. मात्र दुसऱ्या तरुणाला बाहेर काढताना तो स्वतःच पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास शोध मोहीम राबविल्यानंतर या तरुणाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.  कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मांजरली अग्निशमन केंद्रातील लिडिंग फायरमन प्रदीप जाधव, वाहनचालक विजय ढोक, मदतनीस दीपक जाधव, गणेश धुळे, किरण ढिले, नामदेव मेहेर, जगन्नाथ नवले आदींनी बोटीच्या साहाय्याने या तरुणाचा शोध घेतला.

टॅग्स :बदलापूरअपघात