मुंबईतील एका महिलेने केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेवर जाहीर केली आहे. या महिलेने केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना फसवी असल्याचे म्हणत तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करताना आलेल्या अनुभवाबद्दल सविस्तर माहिती दिली.
संबंधित महिलेचे वडील निवृत्त एसबीआय अधिकारी आहेत. त्यांनी ४० वर्षे बँकेत नोकरी केली आणि वेळेवर कर भरला. सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तिच्या वडिलांची प्रकृती बिघडली. दरम्यान, आयुष्मान भारत अंतर्गत बहुचर्चित ५ लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचा लाभ घेण्याच्या आशेने तिने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील योजनेअंतर्गत सूचीबद्ध रुग्णालयांना फोन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मदतऐवजी तिला धक्कादायक अनुभव आला.
महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, “मी एकूण २४ रुग्णालयांना फोन केला. दहा रुग्णालयांनी आयुष्मान भारतशी संलग्न असल्याचे स्पष्टपणे नाकारले. सुमारे सहा रुग्णालये पूर्णपणे पोहोचू शकली नाहीत, लाईन वाजत होत्या किंवा सेवा बंद होती. उर्वरितांनी हास्यास्पद अटी लादल्या, एका रुग्णालयाने म्हटले की, ही योजना फक्त ऑन्कोलॉजीसाठी लागू होते. तर, दुसऱ्या रुग्णालयाने म्हटले की, आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांसाठी ही योजना वैध नाही. नियमित रुग्ण कुठे जातो?" असा प्रश्न तिने उपस्थित केला. या प्रकारामुळे ५० कोटींहून अधिक भारतीयांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या या बहुचर्चित योजनेच्या पारदर्शकता, सुलभता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबद्दल नवीन चिंता व्यक्त केली जात आहे.
पुढे महिलेने सांगितले की, आपल्यासारख्या सुशिक्षित कुटुंबाला संकटात मदत मिळू शकत नसेल तर ज्यांना वाचता लिहिता येत नाही, अशा लोकांना किती मदत मिळत असेल, याची आपण कल्पना करू शकतो. या योजनेंतर्गत दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार देण्याचा दावा केला जातो. परंतु, या योजनेत तफावत जाणवत आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण किंवा राज्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. एखाद्या व्यक्तीला खरोखरच गरज असताना या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे का? असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.