Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: यंदा ‘तुंबई’चा धोका टळणार का? ‘मिठी’च्या सफाईवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:31 IST

Mithi River: मिठी नदीची सफाई सध्या तीन टप्प्यांत सुरू असून आतापर्यंत एकूण १९ टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: मिठी नदीची सफाई सध्या तीन टप्प्यांत सुरू असून आतापर्यंत एकूण १९ टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे. यंदा नियुक्त केलेल्या दोन्हीही कंत्राटदारांकडे कामाचा अनुभव नाही. शिवाय गाळ काढण्यासाठीची कोणतीही आधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मिठी नदी भरून वाहिल्यास आणि मुंबईची तुंबई झाल्यास महापालिकेने जबाबदारी घ्यावी, अशी सूचना काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी गुरुवारी सभागृहात मांडली.

याशिवाय या कंत्राटदारावर कायम नजर ठेवणे आवश्यक असून याचा अहवाल स्थायी समितीसोबत सभागृहातही सादर व्हायला हवा, असेही आझमी यांनी नमूद केले. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या  बैठकीमध्ये मिठी नदीच्या तीन टप्प्यांतील गाळ काढण्याच्या जवळपास २९ कोटी रुपयांहून अधिकच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यामुळे या कामाला वेग येईल, अशी अपेक्षा आहे.  

कंत्राटदार किती गाळ काढतात, कुठे विल्हेवाट लावतात?

आझमी यांनी गुरुवारी सभागृहात मिठीच्या नदीच्या सफाईवर प्रश्नचिन्ह उभे केले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही सध्या मिठी नदीच्या सफाईचे काम सुरू झाले असून कंत्राट मागे घेणे शक्य नाही. मात्र, ते कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. एप्रिल महिना संपत असून अद्याप मिठी नदीची सफाई १९ टक्केच असल्याने आता नवीन कंत्राटाचा घाट घालणे शक्य नाही, त्यामुळे आहे त्या कंत्राटदारावर लक्ष ठेवून, त्यांच्याकडून नालेसफाई करून घेणे हे प्रत्येक नगरसेवकाने आवर्जून करावे, असे मत त्यांनी सभागृहात मांडले. उद्धवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनीही हे कंत्राटदार किती गाळ काढतात? त्याची विल्हेवाट कुठे लावतात, याची तपासणी वेळोवेळी झाली पाहिजे, असे मत मांडले. 

कामाला प्रारंभ नाही 

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिलेल्या मंजुरीची माहिती सभागृहाला देत संबंधित अहवाल सभागृहापुढे ही सादर व्हायला हवा असे मत मांडले. शिवाय एम पूर्व, पश्चिम विभागात अद्याप हव्या तितक्या प्रमाणात नालेसफाई सुरू नसल्याची माहितीही सभागृहाला दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Mithi River Cleaning Concerns Raise Fears of Flooding This Year

Web Summary : Mumbai faces flooding risk as Mithi River cleaning progresses slowly, with only 19% completed. Concerns arise over inexperienced contractors and lack of modern equipment. Officials demand accountability and close monitoring to avert potential disasters during monsoon.
टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र