Join us
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबई आणखी काही दिवस गारेगार; मुंबईचा पाराही घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:29 IST

दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेजारच्या जिल्ह्यांसोबत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई -  दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेजारच्या जिल्ह्यांसोबत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे. महामुंबई परिसरातही सकाळी आल्हाददायक वातावरण राहील. मुंबईचे बुधवारी किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमात आतापर्यंत नोंदविण्यात आलेले हे निचांकी किमान तापमान आहे.

जळगावात तीव्र थंडीची लाट आहे. जळगावला ९.१ अंश तापमान नोंदवले असून सरासरीपेक्षा ६.२ अंशाने खाली आहे. डहाणू, नाशिक, मालेगाव, बीड, यवतमाळ शहरांबरोबरच विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात थंडीच्या लाटेसदृश स्थिती होती. नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देशमधील जिल्ह्यांत शनिवारपर्यंत थंडी जाणवेल. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली परिसरात सोमवारपर्यंत किमान तापमान १८ ते २० अंश असेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. तर, महामुंबईत काही दिवस सकाळी आल्हाददायक वातावरण राहील, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

 

 

टॅग्स :मुंबईहवामान अंदाज