Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
By सचिन लुंगसे | Updated: November 9, 2025 18:24 IST2025-11-09T18:23:15+5:302025-11-09T18:24:16+5:30
Mumbai Cold Wave: यंदा मुंबईत उशिरापर्यंत पाऊस राहिला. चक्रीवादळामुळेही मुंबईकरांना ऑक्टोबर हीटच्या झळा जाणवल्या नाही. आता शीत वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरू लागले आहे.

Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
मुंबई : हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबत आसपासचा परिसर गारठला असून रविवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. चालू मोसमातील आतापर्यंतचा हा किमान तापमानाचा पहिला नीचांक असून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार आहे.
पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात देखील अवकाळी पावसाचा मारा कायम राहिला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा बसला नाही.
हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तापमानात घट
संपूर्ण ऑक्टोबर पावसात निघून गेला असतानाच आता नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नागरिकांना सुखद गारव्याचा अनुभव येत आहे.
चार दिवसांपूर्वी हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे शीत वारे वाहू लागले आहेत. या शीत वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई सोबत आसपासच्या परिसरातील किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे.
मुंबईचे तापमान १९ अंश सेल्सिअसवर
रविवारी सकाळी मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हा संपूर्ण आठवडा याच पद्धतीने किमान तापमानाचा पारा खाली राहील, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. किमान तापमानाचा पारा खाली घसरल्याने मुंबईकरांचा रविवार गारेगार झाला होता. रात्री सोबत दिवसादेखील मुंबईकरांना थंडीचा फील येत असल्याचे चित्र होते.
थंडीची लाट येणार
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमान आणखी खाली जाईल. रात्रीचे तापमान दोन ते चार अंशांनी खाली राहण्याची शक्यता आहे.
हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ ते १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मुंबई १९ वर उतरली आहे. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, शुक्रवारपर्यंत नागरिकांना गारेगार थंडीचा आनंद लुटता येईल. त्यानंतर मात्र तापमानात हलकशी वाढ होईल. मात्र तरिही गारवा कायम राहील.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छ. संभाजी नगर व उत्तर अहिल्या नगर या सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने तर विदर्भात २ डिग्रीने किमान तापमान खाली येईल. सप्ताहभर म्हणजे शनिवारपर्यंत चांगल्या थंडीची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
जळगाव १०.५
परभणी १३.६
नंदुरबार १६.२
नांदेड १५.१
धाराशिव १५
सोलापूर १५.६
अहिल्यानगर १२.५
मालेगाव १४
माथेरान १७.४
सांगली १६.९
मुंबई १९.६
नाशिक १२.५
ठाणे २३
पुणे १४.३
सातारा १४.५
महाबळेश्वर १२.८
छत्रपती संभाजीनगर १२.८
बीड ११.८