Join us  

Mumbai Heat Wave: मुंबईतील उंच इमारती ठरतायत उकाड्याचे कारण; हवामान विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 5:50 PM

IMD Mumbai : हवामान विभागाने पुन्हा एकदा मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आठवड्याच्या शेवटी उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Mumbai Heat Wave : मुंबईकरांना उकाड्यापासून काही काळ विश्रांती मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईत थेट उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अनुमानानुसार रविवारी आणि सोमवारी मुंबईत उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यावेळी तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा पारा वाढणार असल्याने मुंबईकरांना तयारीत राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशातच मुंबईतील या तापमान वाढीमागे गगनचुंबी इमारतींचा देखील वाटा असल्याची माहिती  हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, रायगड जिल्हा आणि मुंबईतील निवडक भागात २७ ते २९ एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आठवड्याच्या शेवटी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जात असताना मुंबई हवामान विभागानुसार हा उकाडा वाढण्यामागे इथल्या उंच इमारतीदेखील आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मातीनुसार, मुंबईतील उंच इमारतींमुळे नेहमीपेक्षा शहरात उष्णता जास्त काळ टिकून राहत आहे.

उंच इमारतींमुळे अडकून राहतेय उष्णता

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबईचे प्रमुख सुनील कांबळे यांनी मंगळवारी सांगितले की, "ज्या दिवशी मुंबईत सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाची नोंद होते, त्या दिवशी उष्णता जास्त काळ अडकलेली दिसते. पण समुद्राने वेढलेली असल्याने मुंबईची वाढ ही उभ्या पद्धतीने म्हणजेच उंच इमारतीच्या रुपात होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मात्र आमच्या कुलाबा आणि सांताक्रूझ येथील दोन वेधशाळांमध्ये दिवसाच्या तापमानात फार मोठी तफावत नाही. वास्तविक कमाल तापमान ३७ अंश किंवा त्याहून अधिक असते आणि कमाल तापमान ४.५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असते तेव्हा हवामान विभाग उष्णतेची लाट घोषित करते."

सुनील कांबळे यांचे हे विधान शहराच्या 2015 सालच्या 'अर्बन हीट आईलँण्ड' या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार आहे ज्यामध्ये उष्णता शोषून घेणारे काँक्रीट आणि डांबर, उच्च लोकसंख्येची घनता आणि प्रदूषण यामुळे तापमान वाढत आहे, असं मत मांडण्यात आलं आहे. अभ्यासानुसार आकाशाच्या दिशेने झालेली वाढ ही उष्णतेला अडकवते, ज्यामुळे तापमानाच्या नोंदींवर परिणाम होतो.

 उष्णतेची लाट का तयार होतेय?

"मुंबईजवळ अँटीसायक्लोन तयार होत आहे, त्यामुळे वाऱ्याचा प्रवाह बदलेल. अरबी समुद्रातून येणारे वारे थांबू शकणार नाहीत आणि ईशान्येकडील वाऱ्यांचा प्रवाह पश्चिमेकडे सरकतील, त्यामुळे तापमानात वाढ होईल. मात्र, यादरम्यान वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये काही बदल झाल्यास उष्णतेची लाट येणार नाही,"अशी माहिती सुनील कांबळे यांनी दिली.

३० वर्षातील सर्वात भीषण वाढ

मुंबईत १६ एप्रिल रोजी सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद करण्यात आली होती. या दिवशी तापमान तब्बल ३९.७ अंश सेल्सियस होते. यासोबत नवी मुंबईतील काही भागात तापमान ४१ अंशापर्यंत पोहोचलं होतं. दुसरीकडे हवामान विभागानुसार तापमानात होत असलेली वाढ ही उष्णतेच्या लाटेचे संकेत देत आहे. 

टॅग्स :मुंबईहवामानउष्माघातठाणेरायगड