झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवण्यात मुंबईतील वाडिया रुग्णालयाला मोठे यश आले. या बाळाने दोन आठवड्यांपूर्वी हँडबॅग झिपर स्टॉपर गिळली होती. बाळाला जेवताना खोकला येत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, १० महिन्याच्या बाळाला जेवताना खोकला आणि चिडचिड होत असल्याने त्याच्या पालकांनी त्याला बालरोगतज्ञांकडे नेले. बाळावर दोन आठवडे उपचार केले. मात्र, तरीही त्याला त्रास जाणवत होता. त्यामुळे पालकांनी त्याला पुन्हा डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना एक्स-रे काढायला सांगितले. त्यानंतर डॉक्टरांसह पालकांनाही धक्का बसला. एक्स-रेमध्ये त्यावेळी अन्ननलिकेत एक धातूची वस्तू अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे बाळाला जेवताना त्रास जाणवत होता. या बाळावर मुंबईतील चिल्ड्रेन स्पेशालिस्ट वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे, अशीही माहिती आहे.