मृत्यूच्या दारातून खेचून आणले! मुंबईच्या रस्त्यावर महिला कॉन्स्टेबलने 'सीपीआर' देत वाचवला कर्मचाऱ्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:20 IST2025-12-26T14:10:38+5:302025-12-26T14:20:51+5:30
वडाळ्यात महिला ट्रॅफिक पोलिसाने सीपीआर देऊन वाचवले हृदयविकाराचा झटका आलेल्या चालकाचे प्राण

मृत्यूच्या दारातून खेचून आणले! मुंबईच्या रस्त्यावर महिला कॉन्स्टेबलने 'सीपीआर' देत वाचवला कर्मचाऱ्याचा जीव
Mumbai Traffic Police: मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांच्या रूपाने अनेकदा माणुसकीचे दर्शन घडते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना वडाळा येथील पूजा जंक्शनवर घडली आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली मांडले यांनी एका चालकाला सीपीआर देऊन जीवनदान दिले आहे. त्यांच्या या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास चेंबूरकडून अँटॉप हिलकडे जाणारी वाहतूक पूजा जंक्शनवर थांबवण्यात आली होती. यावेळी एका कारमधील हालचालींनी दीपाली मांडले यांचे लक्ष वेधून घेतले. कारमधील प्रवासी अचानक ड्रायव्हरच्या सीटच्या दिशेने धावला. सुरुवातीला दीपाली यांना वाटले की ते कदाचित जागा बदलत असावेत, परंतु बारकाईने पाहिल्यावर त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला होता आणि तो श्वास घेण्यासाठी धडपडत होता.
ड्रायव्हर बेशुद्ध होत असल्याचे पाहून दीपाली मांडले यांनी क्षणार्धात धाव घेतली. इतर लोकांच्या मदतीने त्यांनी चालकाला कारबाहेर काढून रस्त्यावर झोपवले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी वेळ न घालवता चालकाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. ट्रॅफिक ट्रेनिंग स्कूलमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा वापर करून त्यांनी अत्यंत संयमाने उपचार केले.
काही वेळातच चालकाच्या शरीरात हालचाल सुरू झाली आणि तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, दीपाली मांडले यांनी वेळेवर दिलेल्या सीपीआरमुळेच त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले.
ऑल इंडिया रेडिओचा ड्रायव्हर; प्रशासनाकडून कृतज्ञता
मिळालेल्या माहितीनुसार, हा चालक भारत सरकारच्या ऑल इंडिया रेडिओ कार्यालयाचा कर्मचारी होता. कारमधील प्रवाशाने मुंबई पोलीस आयुक्तांना ईमेल लिहून दीपाली मांडले यांच्या कामगिरीचे विशेष आभार मानले आहेत. "महिला पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेले धैर्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण हे मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या उच्च दर्जाच्या सेवेचे प्रतीक आहे," अशा शब्दांत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
हे माझे कर्तव्यच होते - दीपाली मांडले
२०१४ मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या आणि सध्या वडाळा ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेल्या दीपाली मांडले यांनी ही कामगिरी नम्रपणे स्वीकारली आहे. त्या म्हणतात, "मी काहीही वेगळं केलं नाही, जे त्यावेळी करणं गरजेचं होतं ते मी केलं. हे माझं कर्तव्यच होतं."
काय असतो सीपीआर?
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक बंद पडते किंवा हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा कृत्रिमरित्या छातीवर दाब देऊन रक्तभिसरण चालू ठेवण्याच्या प्रक्रियेला 'सीपीआर' म्हणतात. ट्रॅफिक पोलिसांना याचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं, ज्याचा फायदा आज एका कुटुंबाला झाला आहे.