Join us

काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:45 IST

काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्यावतीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षासोबत असलेले उत्तर भारतीयांचे नाते, त्यांच्या विकासात पक्षाच्या योगदानाची माहिती अभियानातून दिली जाईल.

मुंबई : मुंबईतील उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस हा मोठा आधार राहिलेला आहे. आगामी काळात या समाजाला काँग्रेस पक्षासोबत अधिक मजबूतपणे जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान सुरू करण्यात येत आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी शनिवारी राजीव गांधी भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्यावतीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षासोबत असलेले उत्तर भारतीयांचे नाते, त्यांच्या विकासात पक्षाच्या योगदानाची माहिती अभियानातून दिली जाईल. उत्तर भारतीय समुदायाच्या प्रसिद्ध ठिकाणांसह प्रत्येक जिल्हा, तालुक्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

नितेश राणेंची हकालपट्टी करामहायुती सरकारमधील भाजपचे मंत्री नितेश राणे हे सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करतात. मंत्रिपदावरील व्यक्तीने अशी विधाने करणे हे संविधान व लोकशाहीला न मानणारा प्रकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानांवर खुलासा करावा. त्यांच्या चिथावणीखोर विधानांची गंभीर दखल घेत तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही खा. गायकवाड यांनी केली.

मराठी हिंदी वादामागे राजकीय अजेंडाकोणत्याही भाषेला काँग्रेसचा विरोध नाही. मराठीचा अभिमान असून, मातृभाषेतूनच शालेय शिक्षण दिले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. सरकारने काढलेले दोन जीआर जनतेचा विरोध पाहून रद्द केले. त्यामुळे आता पुन्हा त्यावरून वाद निर्माण करण्याची गरज नाही. भाषावाद निर्माण करून मारामारी करणे योग्य नसून मराठी हिंदी वादावरून काही लोक राजकीय अजेंडा चालवत आहेत, अशी टीका खा. गायकवाड यांनी केली.

काँग्रेसने नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री अशी विविध पदे देऊन या समाजाचा सन्मान केला. परंतु, काहींनी स्वतःचा फायदा करून घेत या समाजाला विकासापासून वंचित ठेवले, अशी टीकाही खा. गायकवाड यांनी केली.

टॅग्स :काँग्रेसराजकारण