मुंबई-विरारचा प्रवास लवकरच सागरी सेतूमुळे होणार सुसाट, प्रवाशांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:32 IST2025-05-03T11:31:22+5:302025-05-03T11:32:36+5:30
वर्सोवा ते उत्तन हा भाग मुंबई महापालिकेच्या उत्तर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे.

मुंबई-विरारचा प्रवास लवकरच सागरी सेतूमुळे होणार सुसाट, प्रवाशांना मिळणार दिलासा
मुंबई : उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) मंजुरी दिली आहे. तर, त्यापुढील विरार ते पालघर दरम्यानच्या टप्पा २ चा व्यवहार्यता अभ्यास करण्यात येत आहे. हा सेतू आठ मार्गिकेचा असून, उत्तर-दक्षिण प्रवास सहज करणे शक्य होणार आहे. पुढे हा सेतू थेट दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड व लिंक रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासह विरार आणि मुंबई काही मिनिटांत जोडणाऱ्या या कॉरिडॉरमुळे प्रवास वेगवान होईल, असा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे.
वर्सोवा ते उत्तन हा भाग मुंबई महापालिकेच्या उत्तर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी ‘एमएमआरडीए’मार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे उत्तर मुंबई महानगर क्षेत्राचा विकास होणार आहे. २८ मार्च २०२५ रोजीच्या बैठकीत सुधारित टप्पा - १ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
दोन टप्प्यांत प्रकल्पाची विभागणी
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित सुरुवातीला वर्सोवा-विरार सागरी सेतू म्हणून प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली.
ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत हा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडे देण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन टप्प्यांमध्ये प्रकल्प विभागण्यात आला.
विरार आणि मुंबई काही मिनिटांत जोडणाऱ्या या कॉरिडॉरमुळे दैनंदिन प्रवास सुलभ होईल. कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ कमी लागेल. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी वेळेत वैद्यकीय सुविधेपर्यंत पोहोचता येईल.
डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
असा आहे प्रकल्प
उत्तन ते विरार सागरी सेतू २४.३५ किमी
उत्तन जोडरस्ता ९.३२ किमी
वसई जोडरस्ता २.५ किमी
विरार जोडरस्ता १८.९५ किमी