भरधाव कारच्या बोनेटवर झोपून हिरोगिरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ मुंबईतील वांद्रे परिसरातील असल्याचा दावा केला जात आहे. या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण भरधाव कारच्या बोनेटवर झोपलेला दिसत आहे. व्हिडीओत तरुणाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. परंतु, रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करून स्वत:सह इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधित तरुणाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.
@bandrabuzz नावाच्या एका एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "७ जूनच्या मध्यरात्री १२.३७ मिनटांत वांद्रे परिसरातील कार्टर रोडवर एक तरूण भरधाव कारच्या बोनेटवर झोपून स्टंटबाजी करत आहे. अशा धोकादायक स्टंटबाजीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्यात यावी."
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील, हे सांगता येत नाही. या घटनेतील तरुणाविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा आहे.