मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर अनेक ठिकाणी सत्ता समीकरणे जुळवली जात आहेत. त्यात मुंबईत उद्धव ठाकरेंचे ६५ नगरसेवक निवडून आलेत. हे सर्व नगरसेवक बुधवारी शिवसेना भवनात जमले होते. त्यानंतर इथूनच ते सगळे कोकण भवनात गेले. यावेळी उद्धवसेनेच्या एक नगरसेविका बैठकीला गैरहजर असल्याचं समोर आले. नगरसेविका सरिता म्हस्के या नॉट रिचेबल असल्याची बातमी येताच खळबळ माजली. म्हस्के नेमक्या कुठे गेल्या अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर कोकण भवनात गट नोंदणीसाठी सरिता म्हस्के पोहचल्या नाहीत. त्यामुळे उद्धवसेनेचा एक नगरसेवक फुटला अशी बातमी सर्वत्र झळकली. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.
उद्धवसेनेच्या नगरसेविका यांनी रात्री आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर आज सकाळी म्हस्के मातोश्रीवर पोहचल्या. त्याठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर सरिता म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. मला तिथून येण्यासाठी उशीर झाला. बाहेर असल्याने मी नॉट रिचेबल होते. पण जेव्हा मी संपर्कात आले तेव्हा पक्षासोबत माझं बोलणे झाले. माझ्या सुरक्षेसाठी पक्षाच्या आदेशावर मी मुंबईत पोहचेपर्यंत माझा मोबाईल बंद ठेवा असं सांगितले होते असं त्यांनी सांगितले.
तसेच जे निवडणूक लढतात त्यांच्यासमोर किती अडचणी येतात हे सगळ्यांना माहिती असते. माझ्याही समोर अडचणी आल्या. मी ९ वर्ष मेहनत केली होती. परंतु माझे तिकिट कापले गेले. त्यानंतर मी देवाकडे नवस केला होता. माझ्यासमोरील अडथळे दूर होऊ दे. मी निकालानंतर ५ दिवसांत तुझ्या दर्शनाला येईन. पहिल्या बैठकीत मी उपस्थित होते. तेव्हा सोमवारी कोकण भवनात जायचे आहे हे कळले. मंगळवारपर्यंत मेसेज आला नाही त्यामुळे मी दर्शनाला गेले. रात्री जेव्हा मेसेज आला तेव्हा मी देवदर्शनासाठी पोहचले होते. मी त्यानंतर पक्षाला निरोप पाठवला. तेव्हा मला मोबाईल बंद करा असं सांगण्यात आले. आमच्या संपर्कात आल्यानंतर मोबाईल ऑन करा असं सांगण्यात आले होते. त्यानंतर रात्री मुंबईत पोहचले त्यानंतर आम्ही मिलिंद नार्वेकरांच्या घरी गेलो. रात्रभर तिथेच होतो. त्यानंतर सकाळी मातोश्रीवर आलो असं नगरसेविका सरिता म्हस्के यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही जिंकल्याचा त्रास विरोधकांना झाला आहे. त्यामुळे कुठेतरी नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा पसरवल्या गेल्या. आम्ही आमच्या पक्षातील नेत्यांच्या संपर्कात असून काही जण अफवा पसरवत होते. १०० टक्के मी उद्धव ठाकरेंसोबत होते, आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी ५ तास संपर्कात नव्हते त्यामुळे विरोधकांनी बदनामी करण्याच्या हेतूने बातम्या पसरवल्या असा आरोपही नगरसेविका सरिता म्हस्के यांनी केला.
Web Summary : After disappearing, Shiv Sena corporator Sarita Mhaske met Uddhav Thackeray, clarifying she was on a pilgrimage. She claims rivals spread rumors of her being unreachable due to election disputes and affirmed her loyalty to Thackeray.
Web Summary : गायब होने के बाद, शिवसेना नगरसेविका सरिता म्हस्के उद्धव ठाकरे से मिलीं और स्पष्ट किया कि वह तीर्थयात्रा पर थीं। उन्होंने दावा किया कि विरोधियों ने चुनाव विवादों के कारण उनके लापता होने की अफवाह फैलाई और ठाकरे के प्रति अपनी वफादारी की पुष्टि की।