Join us  

मुंबई विद्यापीठाचे 140 कोटींची गुंतवणूक येस बँकेत; विद्यार्थ्यांच्या पैशांचा खेळ केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 3:30 PM

महाविद्यालयांना नॅशनल शेड्यूल्ड बँकेत खाते नसेल तर त्यांची संलग्नता रद्द करण्यात येते असे असताना विद्यापीठाने खासगी बँकेत कसे पैसे ठेवले असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला.

मुंबई: बुडीत गेलेल्या येस बँकेत 140 कोटींच्या ठेवी असल्याची बाब विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उघडकीस आले. सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र याबाबत कुलगुरूंना सविस्तर उत्तर देता आले नाही. यावर चौकशी समितीची स्थापना करून याची माहिती घेण्याचे आश्वासन कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिले मात्र त्यावर समाधान न झाल्याने सदस्यांनी सभा तहकूब केली. 

महाविद्यालयांना नॅशनल शेड्यूल्ड बँकेत खाते नसेल तर त्यांची संलग्नता रद्द करण्यात येते असे असताना विद्यापीठाने खासगी बँकेत कसे पैसे ठेवले असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. विद्यापीठाच्या बजेटमध्ये ठेवींबाबत कोणतीही माहिती सदस्यांना देण्यात येत नाही. हा एक घोटाळा असून यासंदर्भात पोलीस तक्रार करण्याची सदस्यांनी मागणी केली आहे. 

ऑगस्ट 2018 च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतरच मागील महिन्यात 4 बँकांकडून कोटेशन्स मागविण्यात आले आणि सगळ्यात जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत ठेवी ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. सिनेट सदस्यांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांचे पैसे सुरक्षित आहेत. निर्णय घेतल्यास आत्ताही हे फिक्स्ड डिपॉझिट मोडता येईल अशी माहितीही ही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या ठेवी येस बँकेसोबत इतर आणखी 9 बँकांमध्ये सुरक्षित असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :येस बँकमुंबई विद्यापीठविद्यार्थी