मुंबई विद्यापीठाची ‘इंद्रधनुष्य’वर मोहोर, २१ वर्षांमध्ये २० वेळा विजयाचा बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:25 IST2025-11-11T12:25:38+5:302025-11-11T12:25:50+5:30
Mumbai University: १ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ मध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले आहे. विद्यापीठाने सहा सुवर्ण, १० रौप्य आणि एक कांस्यपदकांची कमाई करत चमकदार कामगिरी केली आहे.

मुंबई विद्यापीठाची ‘इंद्रधनुष्य’वर मोहोर, २१ वर्षांमध्ये २० वेळा विजयाचा बहुमान
मुंबई - २१ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ मध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले आहे. विद्यापीठाने सहा सुवर्ण, १० रौप्य आणि एक कांस्यपदकांची कमाई करत चमकदार कामगिरी केली आहे. या विजयासह मुंबई विद्यापीठाने स्पर्धेच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये २० वेळा अंतिम सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक राखण्याचा बहुमान मिळविला आहे.
‘राजभवन’द्वारे आयोजित या महोत्सवात राज्यातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे झालेल्या या महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहर उमटवली आहे. संगीत, साहित्य, नृत्य आणि नाट्य या गटांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये विद्यापीठाने १११ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
विविध स्पर्धांत यश...
मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गायन, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य वाद्यवादन आणि मूकनाट्य या विभागातील स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळविले. तसेच विविध स्पर्धांमध्ये दहा रौप्य पदकांचा बहुमान मिळवला.
विद्यार्थ्यांनी ‘इंद्रधनुष्य’ राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात पुन्हा निर्विवाद वर्चस्व मिळवून विजेतेपदाचा बहुमान मिळवणे हे अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाची बाब आहे. स्पर्धेच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये २० वेळा अंतिम सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविणे हे एक मोठ्या परंपरेचा भाग आहे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
निधी, हर्षचे विशेष यश
निधी खाडीलकर आणि हर्ष नकाशे या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वांत जास्त बक्षिसे मिळवून ‘गोल्डन गर्ल’ आणि ‘गोल्डन बॉय’ चा किताब मिळवला. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.