मुंबई विद्यापीठाच्या एलएलबीच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर; मन:स्ताप सहन करावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 09:36 IST2025-11-24T09:36:25+5:302025-11-24T09:36:51+5:30
विद्यापीठाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कॉलेजांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबीच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर; मन:स्ताप सहन करावा लागणार
मुंबई - मुंबई विद्यापीठाने एलएलबीच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा डिसेंबरच्या मध्यावर घेतल्या जातात. विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षा अचानक दीड महिने पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यी आणि महाविद्यालये संभ्रमात पडले आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होत आला असताना आता विद्यार्थ्यांनी पुढील दीड महिने काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालिका पूजा रौंदळ यांनी दि. ८ सप्टेंबरला काढलेल्या पत्रकानुसार प्रथम वर्षाच्या परीक्षा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र आता मुंबई विद्यापीठाच्या निर्णयानुसार ३ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू केल्या जाणार आहेत.
मन:स्ताप सहन करावा लागणार
विद्यापीठाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कॉलेजांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. विद्यापीठाच्या सप्टेंबरमधील वेळापत्रकानुसार महाविद्यालयांनी तयारी केली होती. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवाळीची सुट्टी रद्द केली. द्वितीय सत्राच्या परीक्षाही जूनमध्ये जाणार आहेत. त्यातून विद्यापीठाचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सध्या कॉलेजांतील अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण अस्पष्ट आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी कार्यकर्ते ॲड. सचिन पवार यांनी दिली.
विद्यापीठ म्हणते, प्रवेश उशिरा झाले
विद्यापीठ शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर तात्पुरते वेळापत्रक जाहीर करते. यंदा एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरापर्यंत चालले.
त्यातून प्रथम सत्राचा अपेक्षित शैक्षणिक कालावधी पूर्ण नव्हता. त्यातून या परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिली.