सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नावीन्यपूर्ण संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 08:26 AM2024-01-28T08:26:09+5:302024-01-28T08:26:36+5:30

Semiconductor Manufacturing: मुंबई विद्यापीठातील नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्माण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे. सामान्य तापमानाला विशिष्ट अर्धसंवाहक पदार्थ निर्माण करण्याचे उपकरण विकसित करण्यात आले आहे.

Mumbai University's innovative research in the field of semiconductor manufacturing | सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नावीन्यपूर्ण संशोधन

सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नावीन्यपूर्ण संशोधन

मुंबई - मुंबई विद्यापीठातील नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्माण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे. सामान्य तापमानाला विशिष्ट अर्धसंवाहक पदार्थ निर्माण करण्याचे उपकरण विकसित करण्यात आले आहे.

या विभागातील डॉ. सुहास जेजुरीकर व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करणाऱ्या संदीप हिंगे, वैभव कदम, ताहीर राजगोली, अक्षय परब या विद्यार्थ्यांनी नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या अभ्यासावर आधारित एक उपकरण तयार केले.

दैनंदिन जीवनात उपयोगी
सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एक महत्त्वाचा घटक असून अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीचा आधार आहे. आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या अनेक उपकरणांच्या निर्मितीत तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. उदा. संगणक, मायक्रोप्रोसेसर, मोबाइल, दुचाकी व चारचाकीसाठी लागणारी स्मार्ट उपकरणे, वैद्यकीय उपकरणे, नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणाली आणि जगाला परस्पर जोडणारे संवादजाल. 

पेटंटसाठी प्रयत्नशील
संशोधनासाठी डॉ. सुहास जेजुरीकर यांना भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे  प्रतिष्ठित अशा टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशन अवॉर्डने २०२० मध्ये गौरवण्यात आले होते. जेजुरीकर व त्यांच्या विद्यार्थी समूहाने उपकरणांची सुधारित आणि व्यावसायिक आवृत्ती बनवली आहे. या संशोधनाकरिता पेटंट मिळवण्याचा विचार आहे. त्यासाठी या उपकरणाद्वारे बहुस्तरीय नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मिती तसेच विविध प्रकारच्या नायट्राईड सेमीकंडक्टर उत्पादनक्षमतेच्या चाचण्या सुरू आहेत. 

महत्त्व का?
 विशिष्ट चिप निर्मितीत नायट्राईड सेमीकंडक्टर हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. 
 त्याचा वापर पॉवर इलेक्ट्रॉनिक, प्रकाश उत्सर्जन, दूरसंवाद, संदेशवहन, वाहन उद्योग, अंतराळ, आण्विक आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो.
 नायट्राईड सेमीकंडक्टर निर्माण हे उच्च तापमानावर अतिशय क्लिष्ट प्रक्रिया पार पाडून बनवण्यात येते. त्यासाठी विशिष्ट, गुंतागुंतीची आणि महागडी उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे वापरण्यासाठी कुशल तज्ज्ञांची आवश्यकता लागते. यामुळे नायट्राईड सेमीकंडक्टर निर्माण ही अधिक खर्चिक व आव्हानात्मक आहे. 

Web Title: Mumbai University's innovative research in the field of semiconductor manufacturing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.