विद्यापीठाचा ऑनलाइन ‘मराठी’साठी पुढाकार; अन्य भाषिकांना संवादात्मक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:19 IST2025-07-08T09:19:47+5:302025-07-08T09:19:47+5:30
संवादात्मक मराठी अभ्यासक्रमांचे एकूण ६ स्तर आहेत. सध्या पहिले तीन स्तर मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत शिकवले जात आहेत

विद्यापीठाचा ऑनलाइन ‘मराठी’साठी पुढाकार; अन्य भाषिकांना संवादात्मक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू
मुंबई - अन्य भाषिकांना संवादासाठी मराठी भाषा शिकता यावी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाकडून संवादात्मक मराठी अभ्यासक्रम शिकविला जातो. विद्यापीठात या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत काही वर्षांपासून ऑनलाइन प्रत्यक्ष संवादात्मक मराठी अभ्यासक्रम राबविले जात आहेत. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना मराठी बोलणे, वाचणे, लेखन आणि ऐकणे (समजून घेणे) ही कौशल्ये शिकवली जातात. यासोबतच व्याकरण आणि संवाद कौशल्याचा सखोल सराव करून घेतला जातो. प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा स्तर १ म्हणजे नव्याने शिकणाऱ्यांसाठी आहे. त्याचे वर्ग रविवारी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत एक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने शिकवले जातात.
संवादात्मक मराठी अभ्यासक्रमांचे एकूण ६ स्तर आहेत. सध्या पहिले तीन स्तर मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत शिकवले जात आहेत. हे अभ्यासक्रम भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. मराठी शिकण्यासाठी सर्व पुस्तके आणि ऑडिओ - व्हिज्युअल साहित्य मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ऑनलाइन मराठी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया याच संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे विभागप्रमुख प्रा. विभा सुराणा यांनी सांगितले.
या गटांसाठी ऑडिओ - व्हिज्युअल सामग्रीसह मराठी शिकवणारी पुस्तकेही तयार
१. रिक्षाचालक व टॅक्सीचालकांसाठी मराठी
२. परिचारिकांसाठी (नर्सेससाठी) मराठी
३. बँक कर्मचाऱ्यांसाठी मराठी
४. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी