Join us  

रक्तदानासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 7:31 PM

रासेयोतर्फे विविध पाच ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन

मुंबई : कोविड-१९ च्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा भासायला सुरुवात झाली आहे. काही शिबीरे रद्द करण्यात आली. रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे रक्ताची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने रक्तदान वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विविध महाविद्यालयांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना करण्यात आले होते. टाळेबंदी सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५ विविध ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालय, भाईंदर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरामध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.मुंबई शहराचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ सतिश कोलते ज्या इमारतीत रहातात त्याच इमारतीत त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले व २४ जणांनी आपला सहभाग नोंदविला. एम एल डहाणूकर महाविद्यालयांमध्ये आजी व माजी रासेयो स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या शिबीरामध्ये ५० जणांनी रक्तदान केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा (जि. रत्नागिरी) येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरामध्ये लांज्याचे पोलिस निरीक्षक श्री संजय चौधर यांनी स्वत: रक्तदान केले व समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. लाला लजपतराय महाविद्यालय, महालक्ष्मी यांच्या रासेयो एककाने आयोजित केलेल्या शिबिरासाठी रक्तपेढीची व्हॅन प्रत्येक रक्तदात्याच्या घरी जाऊन रक्त गोळा केले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक निसर्ग दळवी याने स्वत:तर रक्तदान केलेच पण त्याच्या आईने सुध्दा रक्तदान केल्याचे  राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले.

टॅग्स :रक्तपेढीकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस