मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 06:38 IST2025-11-15T06:37:58+5:302025-11-15T06:38:10+5:30
Mumbai University: मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदोन्नती, निवृत्तीवेतन, रिक्त पदांची भरती आणि निकालाला होत असलेल्या विलंबासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ॲकॅडेमिक स्टाफ असोसिएशन’ने (उमासा) १७ नोव्हेंबरपासून आंदोलनचा इशारा दिला.

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
मुंबई - मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदोन्नती, निवृत्तीवेतन, रिक्त पदांची भरती आणि निकालाला होत असलेल्या विलंबासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ॲकॅडेमिक स्टाफ असोसिएशन’ने (उमासा) १७ नोव्हेंबरपासून आंदोलनचा इशारा दिला. विद्यापीठ प्रशासनाचा काळी फीत बांधून आणि निषेध पट्टी लावून निषेध नोंदविला जाणार असून, मागण्यांची पूर्तता तत्काळ न झाल्यास तीन टप्प्यांत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला. उमासाने याबाबतचे पत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांना दिले आहे.
एएक्यूए हा महत्त्वाचा विभाग फोर्ट कॅम्पसला आहे. या विभागासाठी स्वतंत्र उपकुलसचिव नेमून तो विभाग कलिना परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी संघटनांनी केली. प्राध्यापक पदावर असताना अन्य ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर जाण्यासाठी प्राध्यापकांना धारणाधिकार दिला जातो. सरकारने हा कालावधी १० वर्षांचा केला आहे.
मात्र विद्यापीठाकडून हा धारणाधिकार नाकारला आहे. शैक्षणिक कामासाठी देशाबाहेर जाणाऱ्या प्राध्यापकांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. याबाबतचे पत्र ‘उमासा’चे अध्यक्ष डॉ. बालाजी केंद्रे आणि सचिव डॉ. सचिन गपाट यांनी प्रशासनाला दिले आहे.