Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदवी परीक्षांचे निकाल रोडावलेले; बी.ए., बी.कॉम., बीएस्सीचे निकाल ३० ते ४० टक्क्यांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 09:50 IST

कोविड काळात प्रत्यक्ष अध्ययन बंद असल्याने पदवीच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान अद्याप भरून निघालेले नाही.

मुंबई : कोविड काळात प्रत्यक्ष अध्ययन बंद असल्याने पदवीच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान अद्याप भरून निघालेले नाही. गेल्या काही दिवसांत मुंबईविद्यापीठाने जाहीर केलेल्या परीक्षांच्या निकालांवरून तरी हेच दिसून येत आहे.

विद्यापीठाशी संलग्नित ८८५ व ७० स्वायत्त महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होत आहेत. कोविडपूर्व काळात विद्यापीठाच्या पारंपरिक अभ्यासक्रमांचे निकाल ६० ते ७० टक्क्यांच्या आसपास लागत. मात्र, कोविडनंतरची गेली दोन वर्षे बी.ए., बी.कॉम., बीएस्सी या पारंपरिक परीक्षांचे निकाल ३० ते ४० टक्क्यांपेक्षा कमी लागत आहेत. यंदा यात त्यात थोडीफार सुधारणा झाली आहे. दुसरीकडे सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचे निकाल ८० टक्क्यांची मजल मारत आहेत.  

५२ हजारांपैकी १६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण-

१)  विद्यापीठाचा सर्वाधिक मोठा निकाल बी.कॉम.चा असतो. या परीक्षेला यंदा ५२ हजार ४७८ विद्यार्थी बसले होते. 

२) मात्र, यापैकी अवघे १६ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी तर बी.कॉम.चा निकाल ३८ टक्के लागला होता.

६०-४० वर भिस्त-

नवीन वर्षापासून विद्यापीठ पुन्हा एकदा ६०-४० फॉर्म्युलानुसार परीक्षा घेणार आहे. यात अंतर्गत मूल्यांकनाला ४० गुण दिले जातील. यामुळे कॉलेज-वर्गापासून दुरावलेला विद्यार्थी पुन्हा एकदा लेक्चर्सला बसायला लागेल, अशी आशा प्राचार्यांना आहे.

...यामुळे निकाल रोडावला

१) कोविडमध्ये कॉलेज बंद असल्याने अध्ययन झाले नाही.

२) दोन वर्षे वर्गापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना आता लेक्चरला बसण्यात फारसा रस नसतो. 

३) वर्गात शिक्षकांकडून होत असलेल्या मार्गदर्शनापेक्षा अध्ययनाच्या ऑनलाइन साधनांवर अधिक भर. 

४) ऑनलाइन अध्ययन साधनांची मर्यादा. 

५) सोशल मीडियात रमलेला विद्यार्थीवर्ग. 

६) लेखनकौशल्यावर झालेला परिणाम. 

‘सेल्फ फायनान्स’चा निकाल चांगला का?

गुणवत्तेच्या आधारे प्रवेश केले जात असल्याने सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना फी जास्त असली तरी प्रवेश मिळविण्याकरिता खूप चढाओढ असते. काही कॉलेजात तर या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्येच नोकरीची संधी मिळून जाते. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी तुलनेने अभ्यास, करिअरबाबत अधिक गांभीर्य असलेले असतात.

टॅग्स :मुंबईविद्यापीठविद्यार्थी