वादातून टोकाचा निर्णय; तृतीयपंथी आणि मित्राची माहीम खाडीत उडी; शोध घेऊनही पत्ता नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:30 IST2025-11-12T15:30:26+5:302025-11-12T15:30:45+5:30
माहिम खाडी परिसरात दोघांनी उडी मारल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.

वादातून टोकाचा निर्णय; तृतीयपंथी आणि मित्राची माहीम खाडीत उडी; शोध घेऊनही पत्ता नाही
Mumbai Crime: माहीम खाडीच्या पुलावर वादावादी झाल्यानंतर एका तृतीयपंथी आणि त्याच्या मित्राने खाडीच्या पाण्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छीमारांनी तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले, मात्र तब्बल आठ तासांच्या अथक शोधानंतरही दोघांचाही पत्ता लागला नाही.
माहीम आणि बांद्रा यांना जोडणाऱ्या खाडीच्या पुलावर ही धक्कादायक घटना घडली. मंगळवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास इर्शाद आसिफ शेख (वय २२, तृतीयपंथी) आणि कलंदर अल्ताफ खान (वय २२) या दोघांनी खाडीत उडी मारली. दोघेही वांद्रे पश्चिम येथील लाल माती, नरगिस दत्त नगर परिसरातील राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हे दोघे खाडीच्या पुलावर आले आणि त्यांच्यात जोरदार वाद सुरू होता. काही वेळ वाद झाल्यानंतर, इर्शाद आसिफ शेख याने अचानक खाडीच्या पाण्यात उडी घेतली. इर्शादने उडी घेतल्याचे पाहताच त्याचा मित्र कलंदर अल्ताफ खान याने त्याला वाचवण्यासाठी तातडीने पाण्यात उडी घेतली. मात्र, खाडीतील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दोघेही वाहून गेले आणि दिसेनासे झाले.
एका प्रत्यक्षदर्शीने तात्काळ अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफच्या टीमसह स्थानिक मच्छीमार तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. दिवसभर शोधमोहीम चालवण्यात आली, परंतु रात्री उशिरापर्यंत दोघांचाही कोणताही ठावठिकाणा लागला नाही. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दोघांचाही शोध घेणे कठीण झाले असून ते बुडाले असावेत, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे