मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात एका आयटी इंजिनिअरचाही समावेश आहे. इंजिनिअर डोंबिवलीत स्वप्नातील घर घेण्यासाठी घराबाहेर पडला. प्रचंड गर्दी असल्यामुळे तो लोकलच्या दरवाज्यातच उभा राहिला. परंतु, मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातावेळी तो खाली पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
मयूर शाह (वय, ४४) अशी रेल्वे अपघातात मरण पावलेल्या आयटी इंजिनिअरचे नाव असून विद्याविहारमध्ये नोकरी करायचा. मिळालेल्या महितीनुसार, मयुरची गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत घर प्रक्रिया सुरू होती. ज्या व्यक्तीकडून त्याला घर खरेदी करायचे होते, तो डोंबिवलीत राहतो. त्यामुळे मयूर आज सकाळी त्याला भेटण्यासाठी घराबाहेर पडला.
मयूर हा अविवाहित असून त्याच्या वडिलांचे २२ वर्षांपूर्वीच निधन झाले. सध्या तो आईसोबत ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहत होता. त्याला दोन बहिणी असून दोघींचीही त्यांची लग्न झाली आहेत. घरात कमावणारे तो एकमेव व्यक्ती होता. मयूरच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरने डोंबिवलीत घर घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कधीकधी घराच्या मालकाला डोंबिवलीत भेटायला जायचा. आताही सकाळी तो त्यासाठीच घराबाहेर पडला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.