मुंबई मेरी जान..? मुंबई झाली 'जाम'! काळबादेवी भागात रोजचीच वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:00 IST2024-12-13T14:59:09+5:302024-12-13T15:00:06+5:30

वर्ष १९५६ मध्ये सीआयडी चित्रपटातील जॉनी वॉकर यांचे ऐ दिल है मुश्लिल जीना यहाँ जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान हे गाणे मुंबईच्या आजच्या परिस्थितीलाही तंतोतंग लागू पडते.

Mumbai traffic became big issue in Kalbadevi area | मुंबई मेरी जान..? मुंबई झाली 'जाम'! काळबादेवी भागात रोजचीच वाहतूक कोंडी

मुंबई मेरी जान..? मुंबई झाली 'जाम'! काळबादेवी भागात रोजचीच वाहतूक कोंडी

महेश पवार

मुंबई

वर्ष १९५६ मध्ये सीआयडी चित्रपटातील जॉनी वॉकर यांचे ऐ दिल है मुश्लिल जीना यहाँ जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान हे गाणे मुंबईच्या आजच्या परिस्थितीलाही तंतोतंग लागू पडते. मुंबईला आर्थिक राजधानी बनविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या पायधुनी, क्रॉफर्ड मार्केट, चिरा बाझार, काळबादेवी या व्यापारी केंद्रातील वाहतूक आणि डबल पार्किंगची व्यवस्था पाहता ‘मुंबई झाली जाम’ अशी प्रतिक्रिया येथील व्यापारीवर्गाची आहे. 

दक्षिण मुंबईचा काळबादेवी परिसर व्यापाराचे मुख्य केंद्र मानले जाते. झव्हेरी बाजार, दागिना बाजार, स्वदेशी कपडा मार्केट, मुंबादेवी मंदिर, काळबादेवी मंदिर, भुलेश्वर मार्केट यामुळे हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. दिवसभरात सुमारे लाखभर लोकांची ये-जा परिसरात होते. त्यातही खासगी वाहने, शेअर टॅक्सी, मालवाहू वाहने, बेशिस्त वाहनचालक यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. मात्र, या वाहतूककोंडीला ठिकठिकाणी अनधिकृतपणे करण्यात आलेली डबल पार्किंग कारणीभूत आहे.

कापड मालाची वाहतूक करणाऱ्या हातगाड्या, ट्रक आणि लहान-मोठे टेम्पो, डोक्यावरून माल नेणारे माथाडी कामगार, नागरिक, दुकानासमोर पार्क केलेली वाहने, अरुंद रस्ते, बेशिस्तपणे सुरू असलेली वाहतूक यामुळे येथे रोजच वाहतूककोंडी होते. मात्र, पालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत हे सर्व घडत असताना कोणतीही कारवाई होत नाही, याचे आश्चर्य वाटते.
- सचिन महांबरे, कापड दुकानातील कामगार 

होलसेल मार्केट परिसर असल्यामुळे येथे नेहमी गर्दी असते. लहान-लहान खरेदीसाठी लोक मोठ्या गाड्या घेऊन येतात. जिथे जागा दिसेल तिथे पार्किंग करतात. सणासुदीच्या काळात तर रस्ताही दिसत नाही, अशी परिस्थिती असते. दुहेरी, तिहेरी रांगा लावून दुचाकी आणि चारचाकी वाहने कुठेही पार्किग केली जातात. अशावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास वाहतूककोंडीतून मार्ग काढून मदत यंत्रणा कशी पोहोचणार?
- विमल राठोड, व्यापारी

काळबादेवीमध्ये पार्किंगची व्यवस्था असली तरी त्यासाठी भाडे द्यावे लागत असल्याने अनेक दुकानदार आपल्या दुकानासमोर वाहने उभी करतात. दुकानासमोर मोकळी जागा नसल्यामुळे ग्राहकही दुकानात जाण्यास धजावत नाहीत. त्याचा धंद्यावर परिणाम होतो. यावर दुकानदार, पालिका आणि वाहतूक पोलिस यांनी एकत्र येऊन तोडगा काढा.     
- निखिल डुंबरे

Web Title: Mumbai traffic became big issue in Kalbadevi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई