२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 09:42 IST2025-09-28T09:42:04+5:302025-09-28T09:42:51+5:30

‘मुंबई रेबिज निर्मूलन मोहीम’ हा मुंबई  महापालिका आणि मिशन रेबिजच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, २०३० पर्यंत हे शहर रेबिजमुक्त करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.

Mumbai to be rabies-free by 2030; Municipal Corporation vows to create public awareness | २०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

मुंबई : ‘मुंबई रेबिज निर्मूलन मोहीम’ हा मुंबई  महापालिका आणि मिशन रेबिजच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, २०३० पर्यंत हे शहर रेबिजमुक्त करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. या निमित्ताने जनजागृती मोहीम, आरोग्य, शिक्षण सत्रे आणि लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. वर्ष २०२३ पासून आतापर्यंत १ लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरणासाठी जीपीएस ट्रॅकिंग व डब्ल्यूव्हीएस ॲपसारख्या डिजिटल साधनांचा वापर करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रात या लसीकरण सुविधेसाठी १६३ आरोग्य संस्थांमध्ये अँटी-रेबिज लसीकरण केंद्रे आहेत. रेबिजसंबंधी लसीकरण आणि उपचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. रेबिज आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे, १०० टक्के टाळता येण्यासारखा आहे. दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी ‘वर्ल्ड रेबिज डे’ साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट रेबिजविषयी जागृती करणे आणि ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनातून या रोगाच्या नियंत्रणातील प्रगती अधोरेखित करणे, असे आहे.

श्वान चावल्यावर घ्यावयाची काळजी

> जखम साबण व स्वच्छ पाण्याने १५ मिनिटे धुवा
> हळद, तेल, चुना इत्यादी काहीही लावू नये.
> वैद्यकीय सल्ल्यानुसार अँटी-रेबिज लसीकरण पूर्ण करा.
> गंभीर चाव्याच्या घटनांमध्ये जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील आपत्कालीन उपचार विभागात दाखल करा.
> अपरिचित वा भटक्या प्राण्यांपासून दूर राहा.
> आपल्या पाळीव प्राण्यांना नियमितपणे लस द्या.

कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन

रेबिज रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. वर्ष २०२४ मध्ये श्वानाने चावा घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या  १ लाखपर्यंत आहे. या आकडेवारीत पुनरावृत्ती (डुप्लिकेशन) आणि मुंबई बाहेरील रुग्णांचा समावेश असून, त्यांचे साधारण प्रमाण १५ ते २० टक्के इतके आहे.

Web Title: Mumbai to be rabies-free by 2030; Municipal Corporation vows to create public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.