Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:50 IST

Mumbai Crime: मनोज चंद्रकांत भोसले (वय ३८) असे तरुणाचे नाव असून, तो माथाडी कामगार म्हणून काम करायचा.

मुंबई : दलालामार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या २३ लाखांचे नुकसान झाल्याच्या तणावातून भांडूपमध्ये ३८ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (१७ एप्रिल) सकाळी घडली.

मनोज चंद्रकांत भोसले (वय ३८) असे तरुणाचे नाव असून, तो माथाडी कामगार म्हणून काम करायचा. घटनेची नोंद करत भांडूप पोलीस तपास करत आहेत.

भांडूपच्या सुभाषनगर परिसरातील म्हाडा कॉलनीत मनोज पत्नी आणि मुलासोबत राहतो. तो पूर्वी माथाडी कामगार म्हणून काम करायचा. त्यानंतर मिळेल ते काम करून उदरर्निवाह करत होता. 

शेअर बाजारात किती लाख बुडाले?

त्याने आतापर्यंत जमवलेली जमापूंजी तसेच कर्ज घेत दलालामार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवली. मात्र, त्यात २३ लाखांचे नुकसान झाल्याचे समजताच त्याला धक्का बसला. तो तणावात होता. 

गुरुवारी (१७ एप्रिल) पहाटे साडेचार ते सव्वा पाचच्या सुमारास पत्नी आणि मुलासोबत राहत्या इमारतीच्या जिन्यावरून जात असताना तो अचानक पाठीमागे पळाला.

देशी पिस्तुल काढून गळ्यावर झाडली गोळी

जवळ लपवलेल्या देशी बनावटीचे पिस्टल काढून स्वतःच्या गळ्यावर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली. 

घटनेची वर्दी लागताच भांडूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी शुभांगी भोसले हिच्याकडून वरील घटनाक्रम पोलिसांना समजताच तरुणाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून, या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला आहे.

टॅग्स :गुन्हेगारीशेअर बाजारगुंतवणूकमुंबई पोलीस