Join us  

Mumbai Rain Updates : हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 12:19 PM

पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपत्ती विभाग व्यवस्थापनाला आणि इतर विभागांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई - मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून पुणे, कोल्हापूर याठिकाणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

आपत्ती विभाग व्यवस्थापनाला आणि इतर विभागांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. तसेच राज्यातील शाळांना पावसाची परिस्थिती पाहून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्देश शेलार यांनी दिले आहेत. 

ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाचा फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.  मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 

मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळख असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांपासून मुंबई, ठाणे, नवी आणि रायगडमध्ये मान्सूनने तुफान फटकेबाजी केली आहे. विशेषत: मुंबईत तुफान पाऊस कोसळला असून, येथे 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवस मान्सून राज्यभर सक्रिय राहील. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर राहील. मराठवाड्यातही सरी कोसळतील. गुरुवारनंतर मात्र मान्सूनचा जोर कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरावर व त्या लगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरासह लगतची ओडिशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगालवर ते स्थित आहे. परिणामी, मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय झाला आहे.

रत्नागिरी, महाबळेश्वरमध्ये मध्यम ते मुसळधार

गेल्या 24 तासांत कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस झाला असून, पुढील 24 तासांतही कोकण आणि गोव्यातील काही भागांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. 24 तासांत रत्नागिरी, मुंबई, डहाणू, हर्णे, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई ट्रेन अपडेटमुंबईपाऊस