Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ५० प्रभागांमध्ये शिंदेसेना दुसऱ्या स्थानी; सर्वाधिक जिंकलेल्या जागा उद्धवसेनेविरुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 06:07 IST

जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक १० जागा या उद्धवसेनेविरुद्धच्या

सुजित महामुलकर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेने ९० जागा पदरात पाडून घेतल्या. मात्र, या पक्षाला केवळ २९ जिंकता आल्या. असे असले, तरी हा पक्ष ५० जागांवर दुसऱ्या स्थानी असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. तर, जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक १० जागा या उद्धवसेनेविरुद्धच्या आहेत.

शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशी ४४ ठिकाणी लढत झाली. यात ३४ जागी उद्धवसेनेच्या उमेदवारांना यश आले, तर १० ठिकाणी शिंदेसेनेने बाजी मारली. यात काही जागांवर अटीतटीची लढत झाली. विशेषतः दादर पश्चिमेकडील प्रभाग १९१ मध्ये उद्धवसेनेच्या माजी महापौर आणि माजी आ. विशाखा राऊत आणि सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव-सरवणकर यांच्यात केवळ २०० मतांचा फरक असून राऊत यांना मतदारांनी निवडून दिले.

प्रभाग १२१ मध्ये उद्धवसेनेच्या प्रियदर्शनी ठाकरे विरुद्ध शिंदेसेनेच्या प्रतिमा खोपडे या लढतील ठाकरे यांनी खोपडे यांच्यावर केवळ १४ मतांनी मात केली. अशा प्रकारे ५०० मतांच्या फरकाने अनेक लढती झाल्या असल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. शिंदेसेना विरुद्ध काँग्रेसच्या १४ प्रभागांत लढती झाल्या असून, त्यात दोन्ही पक्षांना प्रत्येकी ७ जागांवर विजय मिळवता आला. यातही प्रभाग २२३ मध्ये शिंदेसेनेच्या प्रिया पाटील आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानराज निकम यांच्यात निकराची लढत झाली. सुरुवातीला पाटील यांनी आघाडी घेतली होती, मात्र अखेर निकम यांनी साधारण ५०० मतांच्या फरकाने प्रभाग काबीज केला.

मनसे-शिंदेसेनेत टक्कर कशी? 

मनसेसोबत शिंदेसेनेचा मुकाबला ७प्रभागात झाला आणि ५ प्रभागात शिंदेसेनेला यश मिळाले, तर २ जागी मनसे उमेदवार जिंकले. शिवाजी नगर-गोवंडी भागात एमआयएम आणि शिंदेसेनेची टक्कर ५ जागांवर झाली, मात्र शिंदेसेनेला केवळ एका जागी यश आले. भाजपसोबतही शिंदेसेनेची दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढत झाली आणि दोन्ही ठिकाणी भाजपने शिदेंसेनेच्या उमेदवाराला पराभूत केले.

शिंदेसेनेने अशी दिली लढत 

जिंकलेल्या जागा 

शिंदेसेना वि. उद्धवसेना : ४४ लढती 

शिंदेसेना : १०, उद्धवसेना : ३४ 

शिंदेसेना वि. काँग्रेस : १४ लढती 

शिंदेसेना: ७, काँग्रेस: ७

शिंदेसेना वि. मनसे : ७ लढती 

शिंदेसेना: ५, मनसे: २ 

शिंदेसेना वि. एमआयएम : ५ लढती 

शिंदेसेना: १, एमआयएम : ४ 

शिंदेसेना वि. वंचित : २ लढती 

शिंदेसेना : २, वंचित : ० 

शिंदेसेना वि. राष्ट्रवादी (अ.प.) : १ लढत 

शिंदेसेना: १, राष्ट्रवादी (अ.प.) : ० 

शिंदेसेना वि. राष्ट्रवादी (श.प.) १ लढत 

शिंदेसेना : १, राष्ट्रवादी (श.प.) : ०

शिंदेसेना वि. समाजवादी पक्ष : १ लढत 

शिंदेसेना : ०, समाजवादी : १ 

शिंदेसेना वि. अपक्ष ः २ लढती 

शिंदेसेना : २, अपक्ष: ० 

शिंदेसेना वि. भाजप : २ लढती 

शिंदेसेना : ०, भाजप : २ 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Second in 50 Wards; Fought Uddhav Sena Most

Web Summary : Shinde Sena secured 90 seats in Mumbai, winning 29. They stood second in 50 wards, winning 10 seats against Uddhav Sena. Close contests marked the election with narrow margins in several wards against various parties.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६एकनाथ शिंदे